मानवी आरोग्यरक्षक म्हणून पशुवैद्यकांनी कार्य करावे - माजी कुलगुरू डॉ. एन.पी.दक्षिणकर
स्वेरीत ‘जागतिक पशुवैद्यक दिना’निमित्त ‘तांत्रिक परिसंवाद’ संपन्न
मानवी आरोग्यरक्षक म्हणून पशुवैद्यकांनी कार्य करावे - माजी कुलगुरू डॉ. एन.पी.दक्षिणकर
स्वेरीत ‘जागतिक पशुवैद्यक दिना’निमित्त ‘तांत्रिक परिसंवाद’ संपन्न
पंढरपूर - ‘वर्तमान काळात प्राण्यांपासून, पक्ष्यांपासून मानवांमध्ये अनेक जीवघेण्या आजारांचे संक्रमण होत आहे. त्या संदर्भात पशुवैद्यकांनी दक्ष राहून प्रतिबंध केला पाहिजे. सद्यस्थितीत प्रतिजैविकांच्या बाबतीत सूक्ष्मजीवांचे प्रतिरोधकता वाढली आहे. त्यामुळे प्रतिजैविकांचा वापर, प्रमाण, पद्धत, काळजीपूर्वक निवडली पाहिजे अन्यथा २०२५ साली सूक्ष्मजीवांना प्रतिबंधित करणारे प्रतिजैवकच उपलब्ध न झाल्यास कोट्यावधी जीव नाश पावतील. यासाठी मानवी आरोग्याचे रक्षक म्हणून पशुवैद्यकांना वर्तमान काळात भूमिका बजवावी लागेल.’ असे प्रतिपादन कामधेनु विश्वविद्यालय, दुर्ग चे माजी कुलगुरू डॉ. एन.पी.दक्षिणकर यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये ‘जागतिक पशुवैद्यक दिना’ निमित्त ‘ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान’ व ‘स्वेरी’ यांनी संयुक्तरीत्या तांत्रिक परिसंवादाचे भव्य आयोजन केले होते. याप्रसंगी कामधेनु विश्वविद्यालय दुर्गचे माजी कुलगुरू डॉ. दक्षिणकर हे तांत्रिक परिसंवादात मार्गदर्शन करत होते तर प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, पुणेचे डॉ.समीर बोरकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी व्यासपीठावर परभणीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. नितिन मार्कंडे, पशुसंवर्धन पुणे विभागाचे माजी सहआयुक्त डॉ.अंकुश परिहार, ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे, सचिव डॉ. अनिल सरदेशमुख, मार्गदर्शक डॉ. टी.एन. बेले, सातारा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, सांगलीचे उपायुक्त डॉ. अजय थोरे, पशुसंवर्धन विभाग, कोल्हापूरचे उपायुक्त डॉ. प्रमोद बाबर, सोलापूरचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिल तांबे, सांगलीचे सहआयुक्त डॉ. विजय ढोके, परभणीचे डॉ. आबासाहेब डक, प्रा.बबन होळ आदी मान्यवर उपस्थित होते.

परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ पशुतज्ञ डॉ. मार्कंडेय यांनी ‘पशुवैद्यकीय पुढील आव्हाने’ या विषयावर बोलताना ‘दुधाळ गाई म्हशींची दुप्पट दूध उत्पादन करण्याची क्षमता, ओझोन थेअरीचा उपचारात वापर, गर्भधारणा प्रमाणात दुप्पट वाढ, वैद्यकीय धर्तीवर मोठ्या शस्त्रक्रिया दुर्बिणीतून करण्याची सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा पशुसंवर्धन मध्ये योग्य वापर आदि बाबी महत्त्वाच्या असून पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय प्रगती निष्णात पशुवैद्यकामुळे झालेली आहे आणि त्यांना ही आव्हाने स्वीकारावीच लागतील.’ असे प्रतिपादन त्यांनी केले. स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी पशुवैद्यक दिनाच्या शुभेच्छा देवून स्वेरीच्या वाटचालीतील विविध टप्पे आणि मिळालेले यश सांगून स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल यशस्वीरित्या चालू असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना सहआयुक्त डॉ. बोरकर म्हणाले की, ‘शासकीय गतिमानता अभियानात पशुवैद्यकांचा सिंहाचा वाटा आहे. भावी काळात अनेक आव्हाने स्विकारण्याची गरज आहे.’ असे सांगितले.
दुपारच्या सत्रामध्ये स्वर्गीय डॉ. सुहास देशपांडे जीवनगौरव पुरस्कार हा ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले माजी सहआयुक्त डॉ. संतोष पंचपौर व ज्येष्ठ पशुतज्ञ, प्रभावी वक्ते व पशुपालकांचे मित्र प्रा. नितीन मार्कंडेय यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. संतोष पंचपौर म्हणाले की, ‘हा सन्मान माझा नसून माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या कार्याचा, पशुपालकांचा आहे.' अधिष्ठाता प्रा. डॉ.नितिन मार्कंडे यांनी ‘राष्ट्रीय उत्पन्नात वृद्धी करणाऱ्या पशुपालकांना हा सन्मान समर्पित करतो.’ असे उद्गार काढले. त्यानंतर स्व.डॉ. चंद्रकांत निंबाळकर उत्कृष्ट पशुवैद्य पुरस्कार सघन कुकुट प्रकल्प, सोलापूरच्या डॉ. स्नेहांका बोधनकर, पशुधन विकास अधिकारी, कोल्हापूरचे डॉ. प्रसाद भामरे, डॉ. राहुल दडस, सातारा, कुक्कुट प्रकल्प, पुणेचे डॉ.दीपक अवताडे, जतचे डॉ. कुणाल कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल व पुष्पहार देऊन प्रदान करण्यात आले.

यावेळी महावेटचे जिल्हाध्यक्ष डॉ. सत्यजित पाटील व राज्य उपाध्यक्ष विजय कोळेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कार्यक्रमास सक्रिय सहभाग देणाऱ्या औषध कंपनी वेलकम वेट फार्मा,विन ब्रिओ फार्मा, मायक्रो लॅब, कन्सन फार्मा, कपिला, हेक्ष्टर, मॅन वेट, एनजी रिच, इलंका, क्रोम लॅब, मनोरमा बँक परिवार, वीर बॅक, सचिन शिंदे, कराड या औषध कंपनी प्रतिनिधींचा तसेच डॉ. भास्कर पराडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. राज सावळकर डॉ. प्रवीण जाधव, डॉ. विजय ढोके, डॉ. शिवराज पवार, डॉ. तानाजी भोसले, डॉ. ब्रह्मानंद कदम, डॉ. संजय हिंगमिरे, डॉ. तानाजी खांडेकर, डॉ. अनिल सरदेशमुख आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर व पुणे या जिल्ह्यातून जवळपास २०० हून अधिक पशुवैद्यक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘असे तांत्रिक परिसंवाद व पशुवैद्यक गुणगौरव कार्यक्रम सातत्याने राबविल्यास आम्हा पशुवैद्यकांना काम करण्यास उर्जा येते.’ अशी अपेक्षा नव पशुवैद्यकांनी व्यक्त केली. सोलापूर आकाशवाणीचे माजी निवेदक प्रथमेश बनसोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.