फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये निवड चाचणी उत्साहात संपन्न
राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा संघाची निवड : प्राचार्य सिकंदर पाटील यांची माहिती
फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये निवड चाचणी उत्साहात संपन्न
राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा संघाची निवड : प्राचार्य सिकंदर पाटील यांची माहिती
सांगोला - राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा संघाची निवड करण्यासाठी टेनिक्वाईट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व टेनिक्वाईट असोसिएशन ऑफ सोलापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जुलै २०२६ रोजी फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथे जिल्हास्तरीय निवड चाचणी उत्साहात पार पडली असल्याची माहिती प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली.

या कार्यक्रमाची सुरुवात फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या हस्ते क्रीडांगण पूजन करून खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिर व निवड चाचणीला प्रारंभ करण्यात आला.दि. ११ ते १३ जुलै २०२६ दरम्यान संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. निवड प्रक्रिया डॉ. भारत इंगवले (सहसचिव, सोलापूर जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशन), बापूराव बाबर (राज्य पंच), गणेश पवार (सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापूर), पंचाक्षरी स्वामी आणि आरिफ तांबोळी (फॅबटेक पब्लिक स्कूल, सांगोला) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या निवड चाचणीत सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांतील सुमारे १२ शाळांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेदरम्यान मोठ्या संख्येने पालक, क्रीडा शिक्षक व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा संघाची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या खेळाडूंसाठी दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण शिबिर सिंहगड पब्लिक स्कूल, सांगोला येथे आयोजित करण्यात येणार आहे.
यावेळी क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य समन्वयक डॉ. भारत इंगवले यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.