पालखी मार्ग, तळांवर सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य - जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
पालखी मार्ग, तळांवर सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य - जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
पंढरपूर :- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै, 2026 रोजी होणार असून या सोह्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच अन्य संतांच्या पालखी सोबत पायी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. भाविकांना सोयी सुविधा मिळण्यासाठी पालखी मार्ग तळ तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी सुचवलेली कामे प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी सांगितले.
आषाढी यात्रा 2026 च्या अनुषंगाने पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रांत अधिकारी सचिन इतापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम तसेच दहा मानांच्या पालख्यांचे विश्वस्त, सोहळा प्रमुख ऑनलाइन द्वारे बैठकीस हजर होते.

आषाढी यात्रा सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून पालखी सोहळे पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात. पालखी सोहळ्यासोबत दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे. पालखी सोहळ्या सोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग व तळांवर कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. तसेच पालखी मार्गावर सोहळ्यांसाठी वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी स्वतंत्र वाहतूक अधिकारी यांची नेमणूक करण्यात येईल. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या बैलजोडी यांना चारा पाणी वॉटरप्रूफ तंबू याची देखील सोय करण्यात येईल.
आषाढी यात्रा सोहळा पावसाळ्यात येत असल्याने भाविकांच्या सुविधेसाठी वाटरप्रूफ मंडपची संख्या वाढविण्यात येईल राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात पालखी सोहळ्यांना काही अडचणी निर्माण झाल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या अडचणी सोडवल्या जातील. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाच्या विस्तारीकरण करण्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच यंदाचा आषाढी यात्रा सोहळा सर्वांच्या सहकार्याने अधिक चांगला कसा होईल या दृष्टीने नियोजन करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी यावेळेस सांगितले.

यावेळी दहा मानाच्या पालख्यांचे विश्वस्त व सोहळा प्रमुखांनी पालखी मार्ग तसेच पालखीतळाच्या ठिकाणी विविध सुविधा बाबतची मागणी केली. यामध्ये मोबाईल टॉयलेट ची संख्या वाढवावी, पालखी सोहळ्याच्या ठिकाणापासून रुग्णवाहिका सोबत असावी. पालखी मार्गावर वॉटरप्रूफ मंडप ची संख्या वाढवावी. पालखी मुक्कामाच्या शाळा, कॉलेज, समाज मंदिर या ठिकाणी व्यवस्था व्हावी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता व अखंडित वीजपुरवठा व पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा करावा. पालखीतळांसाठी वाढीव जागा मिळावी. मुख्य रस्त्यापासून पालखी सोहळे मुक्कामाच्या ठिकाणी जाताना रस्ते अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते ते रस्ते रुंद करून मिळावेत. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांचा इन्शुरन्स करावा अशा विविध मागण्या सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी केल्या.