मंदिर जतन व संवर्धन आराखड्यातील सुरु असलेली कामे 17 मे पर्यंत पूर्ण करावीत - जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
मंदिर जतन व संवर्धन आराखड्यातील सुरु असलेली कामे 17 मे पर्यंत पूर्ण करावीत - जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस
पंढरपूर :- श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी अधिक मासात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत बाजीराव पडसाळी येथील सुरू असलेली कामे दि.17 मे पर्यंत गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकीयेन एस यांनी दिल्या.
श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा बाबत भक्तनिवास येथे बैठक घेण्यात आली या बैठकीस मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्षा तथा पदसिद्ध सदस्या प्रणिता भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे, मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड.माधवी निगडे, प्रकाश महाराज जवंजाळ, शिवाजीराव मोरे,जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, उपकार्यकारी अभियंता भीमाशंकर मिटकरी, मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच ऑनलाइनद्वारे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे व वास्तु विशारद तेजस्विनी आफळे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकीयेन एस. म्हणाले, मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत बाजीराव पडसाळी येथील व्यंकटेश्वर मंदिर, महालक्ष्मी मंदिर, कव्हर शेड आदी कामे तात्काळ पूर्ण करावीत. यासाठी संबंधित कंत्राटदाराने कामाची गती वाढविण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करावे. पुरातत्त्व विभाग व संबंधित कंत्राटदार यांनी मंदिर समितीचे सदस्य यांच्या समवेत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावीत. मंदिरात कोठेही पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. दगडी कोटिंग कामे पुर्ण करावीत तसेच प्रांताधिकारी व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांनी सुरु असलेल्या कामांचा दररोज आढावा घ्यावा. महालक्ष्मी मंदिर येथे भिंतींना ओलावा धरत असल्याने त्याची पाहणी करून तात्काळ उपाययोजना कराव्यात त्याचबरोबर पश्चिमद्वारचे काम तात्काळ सुरू करावे अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, बाजीराव पडसाळी येथील कव्हर शेडचे काम सुरू असल्याने श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांना रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी जाताना अडचणी येतात. अधिक मासात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता कव्हर शेडचे काम तात्काळ पूर्ण करावे. तसेच महालक्ष्मी व बालाजी मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी व्यंकटेश्वर मंदिर व महालक्ष्मी मंदिराचे काम तात्काळ पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांना गती देण्यासाठी मंदिर समितीकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेता संबंधित कंत्राटदाराने तात्काळ कामे पूर्ण करावीत असे सांगितले.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्तिकीयेन एस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन संबधीतांना आवश्यक सुचना दिल्या.