सेवा कार्याला आधुनिकतेची जोड देणारे अधिकारी राजेंद्र शेळके
कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांचा मंदिर समितीमधील सेवापूर्ती बाबत सन्मान
सेवा कार्याला आधुनिकतेची जोड देणारे अधिकारी राजेंद्र शेळके
कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांचा मंदिर समितीमधील सेवापूर्ती बाबत सन्मान,
पंढरपूर :- पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सेवा ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून, लाखो भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेले एक पवित्र कर्तव्य आहे. या भावनेतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर येथे कार्यकारी अधिकारी म्हणून सन २०२३ मध्ये नियुक्त झालेले उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात मंदिर समितीच्या प्रशासनाला आधुनिक, पारदर्शक आणि भाविककेंद्री दिशा देण्याचे उल्लेखनीय कार्य केले.
कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच परिवार देवता मंदिरांच्या जतन व संवर्धनाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करून मंदिरांच्या ऐतिहासिक व धार्मिक वारशाच्या संवर्धनाला प्राधान्य दिले. पंढरीच्या या प्राचीन तीर्थक्षेत्राचे वैभव पुढील पिढ्यांसाठी जतन व्हावे, हा त्यांच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला. भाविकांच्या दर्शन व्यवस्थेतही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. व्हीआयपी दर्शनावर निर्बंध आणून सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याचबरोबर टोकन दर्शन प्रणाली सुरू करून दर्शन व्यवस्थेत शिस्त, पारदर्शकता आणि नियोजन आणण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत भाविकांना विविध धार्मिक सेवा घरबसल्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ऑनलाइन पद्धतीने पूजा उपलब्ध करून देण्यात आल्या. भक्तनिवासातील खोल्यांच्या बुकिंगसाठी संगणकीकृत प्रणाली विकसित करण्यात आली. दर्शन रांगेतील भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी जर्मन हँगर तसेच अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

भविष्यातील भाविकांची वाढती संख्या आणि पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राचा विस्तार लक्षात घेऊन स्कायवॉक व दर्शन हॉलच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. ही कामे केवळ बांधकामे नसून भविष्यातील दर्शन व्यवस्थेची पायाभरणी करणारी महत्त्वपूर्ण पावले आहेत. संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल भक्तीबरोबरच कर्म, सेवा आणि समाजहिताचा संदेश आपल्या अभंगातून दिला. त्यांच्या शब्दांत,
«“जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥”»

या संतविचाराचा अर्थच असा की, ज्यांच्या सेवेत समाजाचे आणि सामान्य माणसाचे हित आहे, तेथेच खरी ईश्वरसेवा आहे. याच भावनेतून राजेंद्र शेळके यांनी आपल्या कार्यकाळात भाविकांच्या सोयी-सुविधांना केंद्रस्थानी ठेवून अनेक निर्णय घेतले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांच्या कार्यकाळातील आणखी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद बाब म्हणजे मंदिर समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच चार आषाढी यात्रांचे नियोजन करण्याचे भाग्य त्यांना लाभले. लाखो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या आषाढी यात्रेचे नियोजन करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान असते. मात्र विविध विभाग, अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणांच्या समन्वयातून त्यांनी या जबाबदारीचे यशस्वीपणे वहन केले.
कर्मचारी वर्गाच्या हिताचाही त्यांनी आपल्या कार्यकाळात गांभीर्याने विचार केला. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची महत्त्वपूर्ण कार्यवाही त्यांच्या कार्यकाळात झाली. तसेच भाविकांना धार्मिक सेवांमध्ये सहभागी होता यावे, यासाठी तुळशी अर्चन पूजा सुरू करण्यात आली आणि नित्य पूजेमध्ये दोन भाविकांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. मंदिर समितीच्या विविध विभागांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवून संस्थेची नियुक्ती करण्यात आली. आधुनिक व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शकता आणि कार्यक्षमता या बाबींना त्यांनी आपल्या प्रशासकीय कार्यपद्धतीत महत्त्व दिले.

मंदिर जतन-संवर्धन, भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था, ऑनलाइन धार्मिक सेवा, भक्तनिवासाचे संगणकीकरण, अत्याधुनिक दर्शन सुविधा, स्कायवॉक व दर्शन हॉलसारखे विकास प्रकल्प, आषाढी यात्रेचे नियोजन, कर्मचारी कल्याण आणि मनुष्यबळ व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले काम त्यांच्या कार्यकाळाची ओळख ठरले आहे. सन २०२३ मध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त झालेले राजेंद्र शेळके यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शासनाने त्यांची कल्याण, जिल्हा ठाणे येथे प्रांताधिकारी म्हणून बदलीने पदस्थापना केली आहे. त्यांच्या जागी मंत्रालयातील कक्ष अधिकारी श्रीकांत यादव यांची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती तसेच कर्मचारी संघटनेच्या वतीने राजेंद्र शेळके यांचा आज भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख, कर्मचारी व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
तीन वर्षांचा कार्यकाळ संपला असला, तरी पंढरीच्या विठुरायाच्या सेवेत त्यांनी घेतलेले निर्णय, सुरू केलेली विकासकामे आणि प्रशासनाला दिलेली नवी दिशा ही त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी ओळख राहणार आहे. पंढरीच्या सेवेत काम करण्याची संधी हीच एक मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्या सेवेत आपल्या कार्याची सकारात्मक छाप उमटवून राजेंद्र शेळके आता नव्या प्रशासकीय जबाबदारीकडे मार्गस्थ होत आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना व त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस यश, समाधान आणि उत्तरोत्तर प्रगती लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!