वाखरी पालखी तळ, भक्ती सागर येथे स्वच्छता मोहिम सुरू - मुख्याधिकारी महेश रोकडे

आषाढी यात्रेसाठी नगरपालिका प्रशासनाची तयारी

वाखरी पालखी तळ, भक्ती सागर येथे स्वच्छता मोहिम सुरू - मुख्याधिकारी महेश रोकडे

वाखरी पालखी तळ, भक्ती सागर येथे स्वच्छता मोहिम सुरू - मुख्याधिकारी महेश रोकडे

आषाढी यात्रेसाठी नगरपालिका प्रशासनाची तयारी

पंढरपूर - जगद्गुरु संत तुकाराम व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांच्या विविध पालख्यांचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने सुरु आहे.  लाखोच्या संख्येने भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. याच भाविकांना चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी नगरपालिकेने वाखरी पालखी तळ, भक्तीसागर 65 एकरात स्वच्छता मोहिम राबवली आहे. तसेच पंढरपूर परिसरात  अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पंढरपूर नगरपालिका प्रशासन आषाढी यात्रेसाठी सज्ज झाले असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि. 25 जुलै रोजी साजरा होत आहे.या यात्रेकरीता 18 ते 20 लाख भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार प्रशासनाने नियोजन करुन तयारी सुरु केली आहे. अतिक्रमणे काढत भाविकांना वाट मोकळी करुन देण्यात आली आहे. तर पाणी पुरवठा, वीज, आरोग्य सुविधा, तसेच स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे.

वाखरी पालखी तळ येथे सर्वच मानाच्या पालखीचा मुक्काम असतो. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते.भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता नगरपालिकेने घेतली आहे. त्यामुळे पाळखी तळ परिसरातील गवत, दगड काढण्यात आले असून संपूर्ण मैदान स्वच्छ करण्यात येत आहे. तसेच मुरूमीकरण करुन रोलरद्वारे सपाटीकरणाची कामे सुरु आहेत. परिसरातील झाडांना रंग देण्याचे काम देखील  सुरु आहे.

संपूर्ण परिसरातील काटेरी झाडे, झुडपे  जेसीबीच्या साह्याने काढण्यात येत आहेत. याकरीता  ट्रॅक्टर फळीच्या सहाय्याने लेव्हलिंग करण्यात येत आहे. दगड -गोटे उचलण्यात आले आहेत,अनावश्यक झाडाच्या फांद्या छाटून घेण्यात आल्या आहेत. तसेच भक्तीवसागर 65 एकर येथे मशीनच्या साह्याने परिसरातील साफसफाई व स्वच्छता करण्यात येत आहे. प्लॉटला नंबरिंग करणे , कायमस्वरूपी शौचालय दुरुस्तीची  कामे युध्दपातळीवर  सुरु आहेत.

वाखरी पालखीतळ, भक्ती सागर होतोय सज्ज

पालखी सोहळे वाखरी पालखी तळ येथे विसावतात. यामुळे येथे होणारी गर्दी लक्षात घेवून स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. तसेच 65 एकर येथेही स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. येत्या चार दिवसात कामे पुर्ण होत आहेत. वाखरी पालखीतळ, भक्ती सागर 65 एकरात भाविकांना अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन देत सेवा करण्यासाठी नगरपालिका सज्ज  असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगीतले.