आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार - परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक
ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार
आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार - परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक
ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार
पंढरपूर - आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार ५०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक,पंढरपूर येथे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर, नगराध्यक्षा श्रीमती प्रणिता भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, सहा. पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नेरपगार, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, विभागीय वाहतूक नियंत्रक अमोल गोंजारी व एसटी महामंडळाचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरातील विविध बसस्थानकांवर थांबलेल्या बसेसची अंतर्गत व बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावे, आषाढी यात्रेसाठी विशेष बससेवा" असा दर्शनी फलक लावण्यात यावा, त्याचबरोबर चालक व वाहक यांच्या आरोग्याच्या वैद्यकीय तपासणीची बसस्थानक परिसरात व्यवस्था करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. परतीच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेवून मार्गनिहाय स्वतंत्र रांगा तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने प्रवाशांना बसेसमध्ये प्रवेश देण्यात यावा तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे,अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विशेष बस सेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' अंतर्गत मोफत प्रवास, तर महिलांना 'महिला सन्मान योजना' अंतर्गत तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असे आवाहन परिवहन मंत्री श्री सरनाईक यांनी केले.

मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटीने ५ हजार १४५ विशेष बसेस चालवून तब्बल २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा त्याहून अधिक सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. एकादशीच्या दिवशी लाखो भाविक परतीच्या प्रवासाला निघत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटीचे ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच वारकरी भाविकांसाठी पंढरपूर व परिसरात चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. या स्थानकांवर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वारी कालावधीत रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या महामंडळाच्या १३ हजार कर्मचाऱ्यांना यामध्ये चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्यासाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने केली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली भीमा बसस्थानची पाहणी -
आषाढी यात्रा शुद्ध एकादशी २५ जुलै २०२६ रोजी असून, आषाढी यात्रा सोहळ्यासाठी वारकरी- भाविकांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुमारे १८ ते २० लाख वारकरी भाविक पंढरपुरात येतात. आषाढी यात्रेसाठी एस.टी ने येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

या अनुषंगाने प्रवासी भाविकांच्या सुविधेसाठी महामंडाळामार्फत पंढरपूर व पंढरपूर परिसरात चार तात्पुरते बसस्थानक निर्माण करण्यात येतात. या अनुषंगाने आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक श्री.विठ्ठल कारखाना, देगाव येथे तात्पुरते भीमा बसस्थानकाची पाहणी केली.
यावेळी वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या भीमा बसस्थाकावर, सुलभ शौचालय, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक आदी बाबतची माहिती घेतली व संबधितांना आवश्यक सुचना त्यांनी यावेळी दिल्या.