यशस्वी होण्यासाठी ध्येय, जिद्द आणि चिकाटी आवश्यक – भाऊसाहेब रूपनर

फॅबटेक बी.फार्मसी विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ संपन्न

यशस्वी होण्यासाठी ध्येय, जिद्द आणि चिकाटी आवश्यक – भाऊसाहेब रूपनर

यशस्वी होण्यासाठी ध्येय, जिद्द आणि चिकाटी आवश्यक – भाऊसाहेब रूपनर

फॅबटेक बी.फार्मसी विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ संपन्न

सांगोला - जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठे ध्येय, ते पूर्ण करण्याची जिद्द आणि सातत्याने प्रयत्न करण्याची चिकाटी आवश्यक आहे. याच गुणांच्या बळावर विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकतात," असे प्रतिपादन भाऊसाहेब रूपनर यांनी केले.ते विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते.

यावेळी त्यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना महत्त्वपूर्ण संदेश दिला.
भाऊसाहेब रूपनर म्हणाले की, महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे मंदिर आहे. येथे मिळालेले ज्ञान, संस्कार आणि अनुभव हेच भविष्यातील यशाचा पाया ठरतात. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेशी नाते कायम ठेवावे. संस्थेचे योगदान कधीही विसरू नये आणि समाजात यशस्वी झाल्यानंतर संस्थेचा गौरव वाढवावा.तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, पुढील शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय करताना कोणतीही अडचण आली तर महाविद्यालयाशी संपर्क साधावा. संस्थेचे शिक्षक व व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय सांगोला येथे बी.फार्मसी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मंगळवार, दि. ९ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. महाविद्यालयीन जीवनातील अविस्मरणीय क्षणांना उजाळा देत विद्यार्थ्यांनी नव्या वाटचालीसाठी सज्ज होत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, प्राचार्य डॉ. संजय बैस, डॉ. नाहीद शेख, प्रा. निदा मुल्ला आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयातील शिक्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्रपरिवार आणि विविध उपक्रमांच्या आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थ्यांनी फॅबटेकमध्ये घालवलेले दिवस आयुष्यभर प्रेरणा देणारे ठरतील, अशा भावना व्यक्त केल्या.

यावेळी प्राचार्य डॉ. संजय बैस, डॉ. नाहीद शेख, प्रा. निदा मुल्ला तसेच इतर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक आयुष्यासाठी शुभेच्छा देत प्रामाणिकपणा, मेहनत आणि समाजसेवेची जाणीव जपण्याचा संदेश दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी घंटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अमृता गायकवाड यांनी मानले. बी.फार्मसी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले