फॅबटेक पाॅलिटेक्निक विद्यार्थ्यांची प्लेसमेंट मध्ये उत्तुंग झेप
८४ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि.कंपनीत निवड: प्राचार्य तानाजी बुरूंगले यांची माहिती
फॅबटेक पाॅलिटेक्निक विद्यार्थ्यांची प्लेसमेंट मध्ये उत्तुंग झेप
८४ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि.कंपनीत निवड: प्राचार्य तानाजी बुरूंगले यांची माहिती
सांगोला - फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक महाविद्यालय, सांगोला मधील विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये घवघवीत यश संपादन करत उद्योग विश्वात दमदार पदार्पण केले आहे. पुणे येथील नामांकित कंपनी असलेल्या बजाज ऑटो लिमिटेड कंपनीने महाविद्यालयातील तब्बल ८४ विद्यार्थ्यांची निवड करून फॅबटेकच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर पुन्हा एकदा विश्वासाची छाप उमटवली.

यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ३९ तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील ४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रासाठी सक्षम बनविण्यासाठी महाविद्यालयात नियमितपणे तांत्रिक प्रशिक्षण, मॉक इंटरव्ह्यू, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य कार्यशाळा आणि प्लेसमेंटपूर्व विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि प्लेसमेंट सेलचे नियोजन यामुळे हे यश शक्य झाले असल्याचे प्राचार्य तानाजी बुरूंगले यांनी सांगितले.

फॅबटेक पॉलिटेक्निकने केवळ शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या करिअरची मजबूत पायाभरणी करण्याची परंपरा कायम राखली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य तानाजी बुरूंगले, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय नरळे, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. महेश वाळूजकर आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
चौकट -
दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियोजनबद्ध प्लेसमेंटपूर्व तयारी यामुळेच विद्यार्थ्यांनी यंदा कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उत्तुंग झेप घेतली आहे." -
प्राचार्य तानाजी बुरूंगले
फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज,सांगोला