स्वेरीत विख्यात अणू शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते ‘ड्रोन लॅब’चे उदघाटन
ड्रोन संशोधनाला मिळणार मोठी गती; समाजोपयोगी उपक्रमांवर दिला जाणार भर
स्वेरीत विख्यात अणू शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते ‘ड्रोन लॅब’चे उदघाटन
ड्रोन संशोधनाला मिळणार मोठी गती; समाजोपयोगी उपक्रमांवर दिला जाणार भर
पंढरपूर - तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा उपयोग ग्रामीण भागातील विकासासाठी व्हावा, या उद्देशाने गोपाळपूर (पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अत्याधुनिक ‘ड्रोन लॅब’चे उदघाटन भारताचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. तांत्रिक शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात नवनवीन शिखरे पादाक्रांत करणार्या स्वेरीने संशोधन क्षेत्रात हे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याचे सर्वत्र स्वागत होत असून याद्वारे ड्रोन संशोधनाला मोठी गती मिळणार असून या‘ड्रोन लॅब’द्वारे समाजोपयोगी उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे.

याप्रसंगी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे, स्वेरीचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. पी. एम. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ड्रोन तंत्रज्ञान आणि संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्र शासन आणि आयआयटी बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या ड्रोन प्रकल्पाशी संबंधित कार्यात स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सक्रिय सहभाग नोंदवत आहे.ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर समाजोपयोगी उपक्रमांसाठी करण्याच्या दृष्टीने ही लॅब नव्या संशोधनावर लक्ष केंद्रित करणार आहे. या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी भविष्यात विशेष तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.

ड्रोन्सचा वापर करून उच्च-रेझोल्युशन स्पेशल डेटाचे संकलन, सर्वेक्षण आणि मॅपिंग यांसारख्या विषयांवर विशेष भर दिला जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होईल.सर्वेक्षण तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक, पर्यावरणीय आणि संरचनात्मक प्रकल्पांसाठी संशोधन केले जाईल. या प्रकल्पाची एकूण किंमत ३३.७३ कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये स्वेरी बरोबरच आयआयटी बॉम्बे, आणि व्हीजेटीआय मुंबई यांचाही समावेश आहे. यामध्ये पिकांच्या अचूक सर्वेक्षणासाठी मल्टिस्पेक्ट्रल कॅमेरा ड्रोन, १० लिटर क्षमता असलेला फवारणी ड्रोन, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी लहान ड्रोन्स ही उपकरणे आणि संसाधने आहेत.

स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प सह-अन्वेषक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. पी. एम. पवार, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. बी. शहापुरे, तसेच भाग्यश्री देशमुख, मारुती आसबे, शिवभक्ती देशमुख, तुषार थिटे, ओंकार लाटणे हे या लॅबचे कामकाज पाहत आहेत.