जनसेवा, संघर्ष आणि निष्ठेचा प्रवास : पंढरपूरच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व मनसे नेते दिलीप बापू धोत्रे
जनसेवा, संघर्ष आणि निष्ठेचा प्रवास : पंढरपूरच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व मनसे नेते दिलीप बापू धोत्रे
पंढरपूर - पंढरपूरच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वेगळ्या कार्यशैलीने आणि जनसंपर्काच्या बळावर ठसा उमटवणारे नाव म्हणजे दिलीप बापू धोत्रे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण करत त्यांनी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. एक नेता, एक झेंडा, एक पक्ष या भूमिकेशी कायम प्रामाणिक राहत त्यांनी राजकीय प्रवासाबरोबरच सामाजिक कार्यालाही तितकेच महत्त्व दिल्याने त्यांना पंढरपूरच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व म्हणून ओळखले जाते.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या दिलीप बापू धोत्रे यांनी संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थी संघटनेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज पंढरपूरच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणे, गरजूंना मदतीचा हात देणे आणि संकटाच्या काळात लोकांच्या पाठीशी उभे राहणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.
कोरोना महामारीच्या काळात त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष दर्शन घडले. या काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या हजारो कुटुंबांना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. पुरोहित, पुजारी, हातावर पोट असणारे कामगार आणि विविध घटकांतील गरजू नागरिकांना अन्नधान्य व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांनी मोठा दिलासा दिला.
कोविड काळात उपचारांची कमतरता लक्षात घेऊन पंढरपूरमध्ये स्वतंत्र कोविड प्लस रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला. रुग्णांना बेडची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्या काळात अत्यंत दुर्मिळ ठरलेली उपचारासाठी आवश्यक इंजेक्शने उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.अनेक कुटुंबांसाठी ही मदत जीवनदायी ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
सामाजिक कार्य केवळ आरोग्यापुरते मर्यादित न ठेवता शहराच्या मूलभूत सुविधांकडेही त्यांनी लक्ष दिले.पंढरपूर शहरातील रस्त्यांवरील खड्डे स्वतःच्या खर्चातून सिमेंट काँक्रीटने बुजविण्याचा उपक्रम सबंध शहर परिसरात त्यांनी राबविला होता. तसेच हिंदू, मुस्लिम स्मशानभूमींच्या दुरुस्तीसाठीही स्वखर्चातून मदत करून सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला आहे.
शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्येही त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला. गुणवंत व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, आजारी नागरिकांच्या उपचारासाठी मदत तसेच अतिक्रमण कारवाईमुळे व्यवसाय गमावलेल्या नागरिकांना आर्थिक आधार देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. विविध जाती-धर्मांतील नागरिकांना देवदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देत सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.
पंढरपूरच्या स्थानिक राजकारणातही त्यांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या राजकीय रणनीतीमुळे सत्तांतर घडल्याची चर्चा झाली आणि त्यांना "किंगमेकर" म्हणूनही ओळख मिळाली. कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे, प्रभावी जनसंपर्क आणि संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
काही दिवसांपूर्वी पुणे–मुंबई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. वारकरी भाविकांच्या तत्परतेमुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि यशस्वी उपचारांनंतर ते सुखरूप बरे झाले. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि विठ्ठलभक्तीमुळेच त्यांच्यावर पांडुरंगाची कृपा असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
अलीकडेच ईशान्य भारतातील मणिपूर येथे उभारण्यात येणाऱ्या विठ्ठल मंदिरासाठी त्यांनी पाच लाख रुपयांच्या देणगीची घोषणा केली. या योगदानातून त्यांच्या विठ्ठलभक्तीबरोबरच धार्मिक आणि सांस्कृतिक जतनाबद्दलची बांधिलकीही अधोरेखित झाली आहे.
राजकारण, समाजकारण, धर्मकारण आणि जनसेवा यांचा समतोल साधत दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूरच्या सार्वजनिक जीवनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संघर्षातून उभे राहून जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेले हे नेतृत्व आजही सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असल्याने त्यांना पंढरपूरच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व म्हणून ओळखले जाते.