पंढरपूर अर्बन बँक उद्योजक घडविण्यात आघाडीवर बँकेस वैधानिक लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग; सभासदांना १०% लाभांश जाहीर
पंढरपूर अर्बन बँक उद्योजक घडविण्यात आघाडीवर
बँकेस वैधानिक लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग; सभासदांना १०% लाभांश जाहीर
पंढरपूर - दि पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक लि., पंढरपूरला सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील वैधानिक लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग प्राप्त झाला असून, बँकेने रु. ४३.१८ कोटींचा ढोबळ नफा व रु. १७.६१ कोटींचा निव्वळ नफा मिळविला आहे. तसेच सभासदांसाठी १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी दिली. बदलत्या बँकिंग व्यवस्थेनुसार ग्राहकांच्या सोयीसाठी चालू आर्थिक वर्षात मोबाईल बँकिंग, यूपीआय यांसारख्या आधुनिक डिजिटल सेवा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि., पंढरपूरची ११४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. १८ जुलै २०२६, रोजी बँकेच्या कर्मयोगी सभागृह, नवीपेठ शाखा, पंढरपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेची सुरुवात स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मागील वर्षात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बँकेचे कुटुंबप्रमुख मा.आमदार प्रशांतराव परिचारक, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.सभासदांचे प्रशिक्षण सत्रही यावेळी आयोजित करण्यात आले.

याप्रसंगी पंढरपूर येथील चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आठ नवोदित सीएंचा बँकेतर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच बँके च्या आर्थिक शिस्तीसाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे सीए राजेंद्र बजाज यांचा विशेष ऋणनिर्देशपर तसेच सोलापूर जिल्हा सहकार भारती अध्यक्षपदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला. लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संचालक सीए अतुल कौलवार यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात बोलताना चेअरमन सतीश मुळे यांनी सांगितले की, बँकेच्या प्रधान कार्यालयासह ३० शाखा कार्यरत असून, मार्च २०२६ अखेर बँकेचे ६५,५८७ सभासद आहेत. बँकेकडे रु.१,४१८.२२ कोटी ठेवी, रु.१,०३७.२९ कोटी कर्जवाटप, रु.५३६.९१ कोटी गुंतवणूक असून एकूण रु.२,४५५.५१ कोटींचा मिश्र व्यवसाय झाला आहे.ते पुढे म्हणाले की, सभासद व ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर बँकेची आर्थिक वाटचाल अधिक सक्षम होत आहे. वैधानिक लेखापरीक्षणात बँकेचा सीआरएआर (CRAR) १४.२५ टक्के असून, मार्च २०२६ अखेर १.३६ टक्के असलेले निव्वळ थकबाकीचे प्रमाण (Net NPA) जून अखेर ०.०० टक्क्यांवर आणण्यात बँकेला यश आले आहे. बँकेचे अंतर्गत लेखापरीक्षण अधिक सक्षम करण्यात आले असून विविध कर्ज योजनांवर ८.५० टक्क्यांपासून व्याजदर उपलब्ध आहेत. सभासदांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सभेदरम्यान पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत १५ ते ३५ टक्के अनुदान असलेल्या कर्ज योजना तसेच ग्रामीण भागातील महिला वर्गासाठी प्रतिभा दुग्ध संपादन कर्ज योजना तसेच सर्व ठेवीदारांसाठी १५ महिन्यांच्या मुदतीची ८ टक्के व्याजदराची ‘सुधन ठेव योजना’ कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या योजनांमधील लाभार्थ्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला. सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी बँक उद्योजक घडविण्यात आघाडीवर आहे.

बँकेचे कुटुंबप्रमुख मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोरोना काळातील प्रतिकूल परिस्थितीनंतर नवनियुक्त संचालक मंडळाने सक्षम नेतृत्व करत बँकेची आर्थिक स्थिती भक्कम केली. आज सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्याइतकी बँकेने प्रगती साधली असून, आगामी काळातही बँकेने अशीच उत्तरोत्तर भरारी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. सभासदांनीही बँकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी बँकेच्या व्हाईस चेअरमन सौ. माधुरीताई जोशी, संचालक राजाराम परिचारक, रजनीश कवठेकर, हरिष ताठे, पांडुरंग घंटी, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, अमित मांगले, अनंत कटप, गणेश शिंगण, ऋषिकेश उत्पात, व्यंकटेश कौलवार, संगिता पाटील, मनोज सुरवसे, अनिल अभंगराव, गजेंद्र माने, प्रभुलिंग भिंगे, उदय उत्पात, सोमनाथ होरणे, शुभम लाड तसेच बँकेचे सभासद, ग्राहक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.