शेतीपंपासाठी किमान ५ तास वीजपुरवठा व ग्रामीण भागात २४ तास सिंगल फेज वीज द्या - दिपक भोसले 

रयत क्रांती संघटनेकडून प्रशासनाला निवेदन; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा.

शेतीपंपासाठी किमान ५ तास वीजपुरवठा व ग्रामीण भागात २४ तास सिंगल फेज वीज द्या - दिपक भोसले 

शेतीपंपासाठी किमान ५ तास वीजपुरवठा व ग्रामीण भागात २४ तास सिंगल फेज वीज द्या - दिपक भोसले 

रयत क्रांती संघटनेकडून प्रशासनाला निवेदन; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा.

पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी पूर्वी मिळणारा आठ तासांचा वीजपुरवठा कमी करून प्रथम पाच तास आणि आता केवळ दोन तास करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या पंढरपूर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना दिपक भोसले रयत क्रांती संघटना राज्य कार्याध्यक्ष, सुनिल काका भोसले भाजपा युवा अध्यक्ष, अशोक कदम सरपंच नेपतगाव,रामचंद्र घोडके सर, काशीनाथ कोळेकर, सचिन घोडके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की सध्या खरीप हंगामाच्या तोंडावर तसेच उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शेतकऱ्यांसमोर पिके व जनावरे वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शेतीपंपासाठी मिळणारा वीजपुरवठा सतत कमी होत असल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आधी आठ तास मिळणारी वीज पाच तासांवर आली आणि आता ती दोन तासांपर्यंत मर्यादित करण्याचे आदेश शासनाने काढल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

रयत क्रांती संघटनेने शासनाकडे उद्योगधंद्यांसाठी दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यापेक्षा शेती व पिण्याच्या पाण्याच्या योजनांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील गावांमध्ये तसेच वाडी-वस्त्यांवर गेल्या एक ते दोन महिन्यांपासून सिंगल फेज वीजपुरवठा अत्यंत अनियमित होत असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहे.

सध्या शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तसेच रात्रीच्या उकाड्यात वीज नसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना त्रास सहन करावा लागत असून आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत शेतीपंपासाठी किमान पाच तास नियमित वीजपुरवठा करावा तसेच ग्रामीण भागातील गाव, वाडी-वस्त्यांवर २४ तास सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

अन्यथा शेतकरी व ग्रामीण नागरिकांच्या प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिला आहे.

महावितरण प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन शेतकरी व ग्रामीण नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.