वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य - जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांची माहिती

वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य - जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांची माहिती

वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य ; जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांची माहिती

जिल्हाधिकाऱ्यांकडून वाळवंट स्वच्छता व शौचालयांची पाहणी

पंढरपूर - आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६ रोजी संपन्न होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरला लाखो वारकरी-भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा व स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी दिली.

पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी-भाविकांना प्रशासनाच्या वतीने चांगल्या दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन सातत्याने प्रयत्नशील आहेत.

शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी वाळवंट तसेच नदीपात्रालगतच्या शौचालयांची पाहणी केली. त्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध आहे का, स्वच्छता राखली आहे का, याची तपासणी केली. काही शौचालये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः उघडून पाहणी केली. 

शौचालयांच्या साफसफाईसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करावे, तसेच शौचालयांची वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी जादा स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कचरा पडू नये यासाठी कचकडा टाकावा, नदीपात्र कायम स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी, तसेच तेथे पडणारा कचरा इतरत्र पसरू नये यासाठी कचराकुंड्यांची संख्या वाढवावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले.

होडीचालकांशी संवाद
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी वाळवंट व परिसराची पाहणी करताना नदीपात्रातील होडीचालकांशी संवाद साधला. आसनक्षमतेपेक्षा जास्त जलप्रवाशांची वाहतूक करू नये, सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर जलवाहतूक बंद ठेवावी, असे त्यांनी सांगितले. जलवाहतुकीदरम्यान प्रवासी व चालक यांनी सुरक्षेच्या साधनांचा वापर करणे अनिवार्य आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

यावेळी त्यांच्या समवेत प्रांत अधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले, जलसंपदा विभागाचे अधिकारी,उपस्थित होते.