योग्य वेळी केलेल्या सत्कारामुळे शिक्षकांना स्फूर्ती मिळते - आमदार समाधान आवताडे 

स्वेरीत पंढरपूर व माळशिरस तालुक्यांसाठी ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’ संपन्न

योग्य वेळी केलेल्या सत्कारामुळे शिक्षकांना स्फूर्ती मिळते - आमदार समाधान आवताडे 

योग्य वेळी केलेल्या सत्कारामुळे शिक्षकांना स्फूर्ती मिळते - आमदार समाधान आवताडे 

स्वेरीत पंढरपूर व माळशिरस तालुक्यांसाठी ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’ संपन्न

पंढरपूर –'समाजात काम करताना चांगल्या माणसांच्या पाठीवर नेहमी कौतुकाची थाप पडावी या दृष्टीने डॉ.बी.पी रोंगे सरांनी  उत्तमरीत्या या सोहळ्याचे आयोजन केले आहे. सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना त्यामुळे स्फूर्ती मिळते. डॉ.रोंगे सरांनी गोपाळपूरच्या माळरानावर शून्यातून विश्व उभे केले आहे, हे सारा महाराष्ट्र जाणत आहे. स्वेरीने वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष संशोधने यशस्वीपणे केली आहेत, करत आहेत. एकूणच त्यांच्या मागे डॉ. रोंगे सरांचा बारीक अभ्यास दिसून येतो.' असे प्रतिपादन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले.

गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने पंढरपूर व माळशिरस तालुक्याकरिता स्वेरीत आयोजिलेल्या ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्या’ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानवरून आमदार समाधानदादा आवताडे बोलत होते. दीपप्रज्वलनानंतर श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य, व खेड (ता. उत्तर सोलापूर) येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एस.व्ही.आय.टी.) चे अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून स्वेरीची वाटचाल सांगून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करत शिक्षकांचे प्रश्न, अडचणी, समस्या ह्या शासन पातळीवर अभ्यासपूर्ण मांडण्यासाठी कटिबद्ध आहे, हे सांगून 'जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कन्फर्ट झोनच्या बाहेर जावून काम करावे लागेल' असे स्पष्ट केले. आजच्या शिक्षकांना खूप अडचणी आहेत, शिक्षक म्हणून मानसन्मान मिळतो आहे परंतु अशैक्षणिक कामाचा बोजा वाढलेला आहे, हे कमी करण्याची गरज आहे.  असे सांगून शिक्षकांचे टीईटी सह अनेक प्रश्न उपस्थित करत प्रलंबित प्रश्नांवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला.

उदघाटक म्हणून माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजित पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, 'पुरस्काराने माणसे मोठी होतात, त्यांची वैचारिक उंची वाढते, त्यांना भविष्यात आदर्श विद्यार्थी, आदर्श संस्था, आदर्श शाळा, महाविद्यालय, आदर्श क्रीडा शिक्षक, आदर्श शिक्षक निवडण्याचे ज्ञान प्राप्त होते. देशाला महासत्ता बनवत असताना आपण आपल्या विचारांवर ठाम राहावे. आपण शिक्षक असल्यामुळे चांगले वाईट याचे ज्ञान असते. डॉ.रोंगे सरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीच्या दालनातून विश्व उभे केले आहे. स्वेरीची गुणवत्ता ही येथील संस्कारामुळे आणि शिस्तीमुळे टिकून आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नांसाठी मी डॉ. रोंगे सरांच्या सोबत असेन.

’महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबईचे अध्यक्ष सुभाषराव माने म्हणाले की, ‘ब्रह्मा, विष्णू यापेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या गुरुजनांचा या ठिकाणी ‘ज्ञानयात्री पुरस्कारा’ने सन्मान होतो आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. गुरूंनी प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल घेत असताना डॉ.बी.पी.रोंगे सरांनी पुरस्कारांच्या रूपाने पाठीवर कौतुकाची थाप ठेवून कामगिरी व ताकद वाढविण्याचे काम केले आहे. अनेक शिक्षक पुरस्कारांसाठी पात्र असताना ते वंचित राहतात. त्यामुळे आदर्श शिक्षक निवडण्याचे काम रोंगे सरांनी केले आहे. डॉ. रोंगे सर तुम्ही आमदार झालात म्हणून समजा, या जिल्ह्यातील सर्व शाळांतील शिक्षक आपल्या पाठीशी असतील कारण तुम्ही शून्यातून जग निर्माण केले आहे. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता असते. म्हणूनच डॉ. बी.पी. रोंगे सर शिक्षक आमदार होण्यासाठी पात्र आहेत आणि ते लवकर आमदाराच्या खुर्चीवर स्वार होणार आहेत. श्रीराम शिक्षण संस्था, पानीवचे अध्यक्ष प्रकाश पाटील म्हणाले की, या व्यासपीठावर दोन आमदार अगोदरच आहेत आता तिसरा ही आमदार या ठिकाण यावा अशी सर्वांची इच्छा आहे.

आपल्या हक्काचा माणूस, जवळचा माणूस, अभ्यासाचा माणूस असलेल्या रोंगे सरांना विधानसभेवर आमदार म्हणून पाठवा. आपल्या हक्काचा माणूस असल्यामुळे डॉ.रोंगे सर हे शिक्षकांच्या समस्या अभ्यासपूर्ण प्रश्न मांडू शकतात. प्राचार्य उत्तरेश्वर मुंढे यांनी ही डॉ. रोंगे सरांच्या कार्यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. कार्यक्रमात जवळपास २१० जणांना आदर्श संस्थापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक असे विविध पुरस्कार देण्यात आले. यामध्ये सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, विठ्ठलाची प्रतिमा, शाल, श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी पंढरपूर तालुका मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष कवडे, राजाराम शिक्षण संकुलच्या रजनी जाधव, भारूडकार चंदाताई तिवाडी, श्रीमती ज्योतीताई कुलकर्णी, इतर मान्यवर तसेच पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक आदी मिळून जवळपास १२०० जण उपस्थित होते.प्रा. यादव पनसवाड व प्रा. तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले व सर्वांचे आभार मानले. यावेळी संपूर्ण स्वेरी कॅम्पसमध्ये फेटे परिधान करून सर्वजण पुरस्कारांसह फोटो काढत होते.