मनसेच्या मागणीला यश; मुख्यमंत्र्यांनी दिले संबंधित विभागांना आदेश
मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांची माहिती
मनसेच्या मागणीला यश; मुख्यमंत्र्यांनी दिले संबंधित विभागांना आदेश
यात्रा अनुदान पाच कोटी वरून दहा कोटी ; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला मिळणार मदत; पंतप्रधान आवास योजनेचे काम होणार सुरू
मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांची माहिती
पंढरपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूर यात्रा अनुदान पाच कोटी वरून दहा कोटी करावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे व नागरिकांना मदत मिळावी, पंढरपूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेचे काम तात्काळ सुरू करावे या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते.
या मागण्यांची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर आषाढी यात्रा अनुदान दहा कोटी रुपये मंजूर केली असून पावसामुळे नुकसान झालेल्या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक यांना त्वरित मदत करण्याचे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची सह्याद्री या शासकीय विश्रामगृहावर मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर यांनी भेट घेऊन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यावर चर्चा करून निवेदन दिले.देण्यात आलेल्या निवेदनामध्ये येणाऱ्या आषाढी एकादशीला पंढरपूर शहराला जास्तीत जास्त मदत करावी. आषाढी यात्रेस येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घ्यावी आणि आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या प्रत्येक दिंडीला शासनाने मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरवर्षी आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्र शासन 5 कोटी रुपये यात्रा अनुदान देण्यात येते परंतु हे यात्रा अनुदान अतिशय कमी पडत असल्याने यावर्षी दहा कोटी रुपये यात्रा अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच पंढरपूर प्रचंड पाऊस पडल्याने हजारो शेतकऱ्यांचे त्याचबरोबर अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. या नागरिकांना तात्काळ मदत मिळावी.

रखडलेले पंढरपूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी मनसेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती.याची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आषाढी यात्रेसाठी यात्रा अनुदान पाच कोटी वरून दहा कोटी रुपये देण्याचे संबंधितांना आदेश दिले आणि यात्रेला येणाऱ्या प्रत्येक दिंडीला मदत करण्याचेही आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. याचबरोबर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे व नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत
तसेच पंढरपूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजना मंजूर होऊन चार वर्षे झाले अद्याप पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे मिळाली नाहीत, प्रधानमंत्री आवास योजनेचे काम बंद असलेले काम त्वरित सुरू करण्यात यावे व लाभार्थ्यांना घरे द्यावीत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.यावेळी त्वरित प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे देण्याचे आदेश संबंधिताना देण्यात आले असल्याची माहिती मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी दिली.