सांगोला महोत्सवातून रोजगाराची नवी दिशा; ७०० युवकांच्या मुलाखती, ३०० जणांना नोकरीची संधी

ग्रामीण युवकांनी नोकरी मागणारे नव्हे तर उद्योग घडवणारे बनावे -  भाऊसाहेब रूपनर

सांगोला महोत्सवातून रोजगाराची नवी दिशा; ७०० युवकांच्या मुलाखती, ३०० जणांना नोकरीची संधी

ग्रामीण युवकांनी नोकरी मागणारे नव्हे तर उद्योग घडवणारे बनावे -  भाऊसाहेब रूपनर

सांगोला महोत्सवातून रोजगाराची नवी दिशा; ७०० युवकांच्या मुलाखती, ३०० जणांना नोकरीची संधी

सांगोला - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या “सांगोला महोत्सवा”त रोजगार आणि उद्योग क्षेत्राला नवे बळ देणारा भव्य नोकरी महोत्सव उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

फॅबटेक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात तब्बल ४० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या. विविध क्षेत्रातील कंपन्यांनी युवक-युवतींच्या थेट मुलाखती घेतल्या. यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ७०० पेक्षा अधिक युवक-युवतींनी सहभाग नोंदवत रोजगारासाठी मुलाखती दिल्या, तर प्राथमिक निवड प्रक्रियेतून ३०० हून अधिक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असुन ग्रामीण भागातील युवकांनी नोकरी मागणारे नव्हे तर उद्योग घडवणारे बनावे असे प्रतिपादन फॅबटेक उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी नोकरी महोत्सव उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

नोकरी महोत्सवाचे उद्घाटन भाऊसाहेब रूपनर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी प्रा. विठ्ठल शिंदे, अँड. सचिन देशमुख, उद्योजक बाळासाहेब एरंडे, डॉ. संजय आदाटे, प्रा. दिनेश रूपनर, प्रा. धनंजय शिवपुजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय आमदार भाई डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींचे विठ्ठल मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना भाऊसाहेब रूपनर म्हणाले,
“ग्रामीण भागातील युवकांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता अफाट आहे. मात्र योग्य संधी आणि व्यासपीठ मिळत नाही. सांगोला महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात अशा उपक्रमांचा अधिक व्यापक विस्तार करण्यात येईल.”

नोकरी भरती मेळाव्यात उत्पादन, ऑटोमोबाईल, आयटी, इलेक्ट्रिकल, फार्मा, बँकिंग, सर्व्हिस सेक्टर आदी क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग घेतला होता. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे प्राथमिक निवड करण्यात आली. अनेक युवकांना ऑन-द-स्पॉट ऑफर लेटर देण्यात आल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी हा महोत्सव आशेचा किरण ठरला. मोठ्या शहरांमध्ये जाऊन नोकरी शोधण्याऐवजी सांगोल्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणीच नामांकित कंपन्यांच्या मुलाखती होत असल्याने युवकांनी समाधान व्यक्त केले.

हा नोकरी महोत्सव यशस्वी करण्यासाठी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, फॅबटेक मल्टिस्टेट बँक, फॅबटेक फाउंडेशन तसेच विविध संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सांगोल्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावा झाल्याने संपूर्ण तालुक्यात या उपक्रमाची चर्चा रंगली आहे.