शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख जाहीर; संभाजी शिंदे यांची वर्णी
शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख जाहीर; संभाजी शिंदे यांची वर्णी
पंढरपूर - शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी नवीन जिल्हा प्रमुखाच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. यामध्ये संभाजी शिंदे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपरिषद, स्थानिक | स्वराज्य संस्था निवडणुका पार पडल्या आहेत. यामुळे आता प्रत्येक पक्षाने पक्ष वाढीकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी जिल्हाप्रमुखांच्या नियुक्ती केल्या आहेत. यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या तीन तालुक्याची जिल्हा अध्यक्षाची जबाबदारी संभाजी शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. गेल्या 32 वर्षापासून संभाजी शिंदे पंढरपूर तालुक्यात शिवसेनेचे काम करत आहेत. त्यांचे चांगले कार्य असल्यामुळे या कार्याची दखल घेऊन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा त्यांना काम करण्याची संधी दिली आहे.
जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर संभाजी शिंदे म्हणाले, तीन तालुक्यांमध्ये शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी घर तेथे शिवसैनिक अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक वार्डामध्ये शिवसेनेची शाखा उघडण्यात येणार आहे. शिवसेना सदस्य नोंदणी अभियान लवकरच राबविण्यात येणार आहे. कोरोना काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या होत्या. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. आता शिवसेनेचे काम प्रत्येक वाड्यावरपर्यंत पोहोचविण्यासाठी कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.