राष्ट्रवादीच्या प्रांतिक सदस्यपदी कल्याणराव काळे यांची निवड तर पंढरपूर तालुकाध्यक्षपदी अनिल नागटिळक
राष्ट्रवादीच्या प्रांतिक सदस्यपदी कल्याणराव काळे यांची निवड, तर पंढरपूर तालुकाध्यक्षपदी अनिल नागटिळक यांची निवड
राष्ट्रवादीच्या प्रांतिक सदस्यपदी कल्याणराव काळे यांची निवड, तर पंढरपूर तालुकाध्यक्षपदी अनिल नागटिळक यांची निवड
पंढरपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट प्रांतिक सदस्यपदी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, तर राष्ट्रवादीच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी अनिल नागटिळक यांची निवड करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा मोठा गट राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना येथील कल्याणराव काळे यांनी सुरुवातीलाच आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह समर्थन दिले.दरम्यान, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या.याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार प्रांतिक सदस्यपदी काळे यांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी घोषित केले. या निवडीनंतर कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी कारखान्याच्या संचालक मंडळाकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी पंढरपूर तालुकाध्यक्षपदी अनिल नागटिळक, जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. आर. डी. पवार, हणमंत पवार, नवनाथ माने, जिल्हा कार्याध्यक्षपदी नारायण शिंदे, जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी अर्जुन जाधव, तर तालुका कार्याध्यक्षपदी सुनील पाटील यांची निवड साळुंखे-पाटील यांनी जाहीर केली आहे. या निवडीत काळे समर्थकांना चांगली संधी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.