मोहोळ मतदारसंघात रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करा ; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांची मागणी
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांची मागणी
मोहोळ मतदारसंघात रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करा ;
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांची मागणी
मोहोळ - विधानसभा मतदारसंघात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामीण कुटुंबांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात आणि तातडीने सुरू करावीत, अशी मागणी आमदार राजू खरे यांनी केली आहे.यासंदर्भात त्यांनी रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट घेऊन मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)' अंतर्गत दुष्काळग्रस्त तालुक्यांना प्राधान्य देऊन रोजगारनिर्मितीची कामे सुरू करण्याबाबत प्रशासनाला देण्यात आलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये स्थानिक गरजांचा विचार करून कामांचे नियोजन करावे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार खरे यांनी मंत्री गोगावले यांच्याकडे केली.

दुष्काळामुळे शेतीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातच काम उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी जलसंधारण, मृदसंधारण, सिंचन, पाण्याची उपलब्धता वाढविणारी कामे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन तसेच ग्रामीण पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार खरे यांनी स्पष्ट केले.
रोजगार हमीच्या कामांमुळे नागरिकांच्या हाताला तातडीने रोजगार मिळण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी आवश्यक जलसाठे आणि जलसंधारणाच्या सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच शेतीला आधार देणाऱ्या कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे, असे आ.खरे म्हणाले.
शासनाने केवळ रोजगारनिर्मितीवर भर न देता दुष्काळ निवारण आणि ग्रामीण विकासाला दीर्घकालीन आधार देणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे, दुष्काळग्रस्त गावांमध्ये तातडीने रोजगार हमीची कामे सुरू करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.
- राजू खरे, आमदार,मोहोळ