भीमा नदीला पाणी सोडण्याबाबत पालकमंत्र्यांकडे आग्रही मागणी - रणजितसिंह शिंदे
भीमा नदीला पाणी सोडण्याबाबत पालकमंत्र्यांकडे आग्रही मागणी - रणजितसिंह शिंदे
नदीकाठचा वीजपुरवठाही 4 तास करण्याची मागणी
पंढरपूर - भीमा नदी कोरडी पडली असून हातातोंडाशी आलेली पीके जळून चालली आहेत, याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भेटून उजनी धरणातून भीमा नदीला तत्काळ पाणी सोडावे आणि नदीकाठचा 2 तासावर आणलेला वीजपुरवठाही 4 तास करण्याची आग्रही मागणी करण्यात आली असल्याचे जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले.

श्री. शिंदे यांनी रविवारी सायंकाळी खेडभोसे (ता. पंढरपूर) येथील कोरड्या पडलेल्या नदी पात्राची पाहणी केली.
यावेळी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी सिद्धेश्वर पवार, उपसरपंच विकास पवार, ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार, पांडुरंग पवार, सोसायटीचे माजी चेअरमन बाबुराव पवार, माजी सरपंच दिलीप पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बंडू पवार, सत्यवान जाधव, प्रशांत पवार, संतोष मोरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि त्यांच्या उभ्या पिकांच्या रक्षणासाठी माझा पाठपुरावा सातत्याने सुरूच राहील. भीमा नदीकाठ परिसरातील शेतकऱ्यांनी उभी पिके जळू लागल्याने तसेच जनावरे व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नदीला पाणी सोडून बंधारे भरून देण्याची विनंती करण्यात आली आहे.

यावेळी सत्यवान जाधव प्रशांत नाना पवार धनाजी पवार, दत्तात्रय पवार, सचिन मोरे, शंकर दीक्षित, समाधान माने, प्रवीण पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.