एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
पंढरपूर - हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय क्रीडा दिवस वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये विविध क्रीडा स्पर्धा आणि उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे निवृत्त क्रिडा शिक्षक भालचंद्र देवधर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध गटांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विश्वशांती गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत खेळाडूवृत्तीचे दर्शन घडविले. प्रमुख पाहुणे भालचंद्र देवधर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “क्रिडा क्षेत्राकडे केवळ मनोरंजनाचा एक भाग म्हणून न पाहता, त्यामध्ये उज्ज्वल करिअर घडविण्याच्या संधी शोधणे ही आजच्या काळाची गरज आहे. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सांघिक भावना विकसित होतात”, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनी एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये उपलब्ध असलेल्या विविध क्रीडा सुविधांची आणि जिल्हा तसेच विभागीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे क्रिडा शिक्षक मनीष संपांगे, ऋषिकेश गावडे, पल्लवी पाटील आणि वैभव चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.