भीमा नदीवर बॅरेज बांधून संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी भिमानदीवरील बॅरेजेस बांधण्यात यावे  - चेअरमन कल्याणराव काळे यांची मागणी

भीमा नदीवर बॅरेज बांधून संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी भिमानदीवरील बॅरेजेस बांधण्यात यावे  - चेअरमन कल्याणराव काळे यांची मागणी

भीमा नदीवर बॅरेज बांधून संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी भिमामदीवरील बॅरेजेस बांधण्यात यावे  - चेअरमन कल्याणराव काळे यांची मागणी

पंढरपूर - उजनी धरणाच्या पाणीवाटप धोरणाप्रमाणे सद्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. याप्रक्रियेत भिमानदीतून शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत नाही केवळ शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी पाणी सोडून त्या काळात वीज पुरवठा खंडित करण्याची पद्धत सुरु झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. भविष्यातील कायमस्वरूपी पाणी टंचाई टाळण्यासाठी भिमानदीवर बॅरेजेस बांधण्यात यावेत अशी मागणी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केली आहे.

उजनी धरणाच्या निर्मितीवेळी विस्थापित बहुतांश धरणग्रस्ताचे पंढरपूर तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. तालुक्यातील नदीकाठच्या बहुतेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाटप धरणग्रस्तांना करण्यात आले आहे त्यामुळे धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भिमानदीतून पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदीवर पाणी परवाने काढून लाखो रुपये खर्चून दूरवर पाईप लाईन करून सिंचन व्यवस्था केली आहे. मात्र सध्या भिमानदीतून सिंचनासाठी कायम स्वरूपी पाणी सोडण्याऐवजी केवळ सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनीतून पाणी सोडण्यात येते व त्याकाळात शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद करण्यात येतो. सततच्या या प्रकारामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांवर कायम स्वरूपी पाणी टंचाईची टांगती तलवार राहते.

भीमानदी हे शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाचे कायम स्वरूपी मूळस्त्रोत आहे. भिमानदीपात्र हे अनेक जलचर जीव व पक्षांचे आश्रय स्थळ असून त्यामुळे निसर्गचक्र सुरक्षित राहतात. सद्या सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी समांतर जलवाहिनी सुरु करण्यात आली आहे त्यामुळे नदीपात्रात पाणीसोडणे आलीकडे वरचेवर लांबत आहे, परिणामी नदीकाठच्या शेतकऱ्यांना वारंवार पाणी  टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नदीकाठच्या गावातील बहुतेक ठिकाणी शेतीला पाणीपुरवठा करणारे कॅनल मोडण्यात आले आहेत. काही ठिकाणी त्याचा मागमोसही शिल्लक नाही अशावेळी शेतकऱ्यांना सिंचनासाठी भिमानदी शिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

भिमा नदीवर बॅरेजेस बांधण्यात यावेत या शेतकऱ्यांच्या हिताच्या मागणीसाठी आपण गेली १५ वर्षाहून अधिककाळ सातत्याने पाठपुरवठा करत आहोत. या पूर्वी कॅनलमध्ये ठिय्या मांडणे, रस्तारोको, मोर्चे इत्यादी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधलेले आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांना तसेच सोलापूर जिल्यातील सर्वपक्षाच्या लोकप्रतिनिधीना प्रत्यक्ष भेटून या बाबत शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याचे विनंती करून लेखी निवेदन दिले आहेत. मात्र मागील अधिवेशनात कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून शेतकऱ्यांच्या हिताच्या या मागणीसाठी खंबीरपणे पाठपुरावा केल्याचे दिसून येत नाही.

भविष्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांची संभाव्य भीषण पाणीटंचाई टाळण्यासाठी भिमानदीवर बॅरेजेस बांधणे ही काळाची गरज ओळखून लोकप्रतिनिधीनी याबाबत पाठपुरावा करणे गरजेचे आहे.