स्वेरीत चौथी आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२२’ चे थाटात उदघाटन

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजाचा शाश्वत विकास साध्य करणे आवश्यक - माजी संचालक रघुनाथ शेवगावकर

स्वेरीत चौथी आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२२’ चे थाटात उदघाटन

स्वेरीत चौथी आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२२’ चे थाटात उदघाटन

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजाचा शाश्वत विकास साध्य करणे आवश्यक - माजी संचालक रघुनाथ शेवगावकर

पंढरपूर- ‘तंत्रज्ञान आणि समाज हे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. आजचे २१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे. येत्या काळात आरोग्य, शिक्षण, व्यापार आदी क्षेत्रांत माहिती व तंत्रज्ञान तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ड्रोन व रोबोट तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, थ्रीडी प्रिंटिंग या बाबींचे महत्व आणखी वाढणार आहे. तंत्रज्ञानाच्या वापरातून आज मानवासमोर अनेक आव्हाने देखील निर्माण झाली आहेत. आज नैसर्गिक ऊर्जास्रोत कमी कमी होत चालले आहेत तसेच इतरांशी आवश्यक असणारा संवादही कमी होत चालला आहे. त्यामुळे आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजाचा शाश्वत विकास साध्य करणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्लीचे माजी संचालक व सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. रघुनाथ शेवगावकर यांनी केले.

 स्वेरीमध्ये आज व उद्या दि.१० डिसेंबर रोजी  ‘टेक्नो-सोसायटल २०२२’ ही चौथी आंतरराष्ट्रीय परिषद होत असून या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी संचालक रघुनाथ शेवगावकर हे मार्गदर्शन करत होते. दिपप्रज्वलनानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे, पाहुण्यांचे, सहभागी प्राध्यापक व संशोधकांचे स्वागत करून स्वेरी या  संस्थेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे सहसमन्वयक व स्वेरी अभियांत्रिकीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेची सुरुवात कशी झाली आणि ही परिषद आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट करून २०१६, २०१८ आणि २०२० साली झालेल्या प्रत्येक परिषदेबद्दल थोडक्यात माहिती दिली. कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे विद्यार्थी यश कौलवार यांनी तयार केलेल्या  ‘टेक्नो-सोसायटल २०२२’ या मोबाईल ऍप चे मान्यवरांच्या हस्ते बटन दाबून उदघाटन करण्यात आले.

पुढे बोलताना माजी संचालक व माजी कुलगुरू शेवगावकर म्हणाले की, 'ही माझी स्वेरीला पहिली भेट आहे. आज हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे कारण ज्या परिषदेचे उदघाटन २०१६ मध्ये पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर सरांनी केले होते त्याच परिषदेचे उदघाटन करण्याची आज मला संधी मिळाली. या परिषदेचे 'टेक्नो-सोसायटल' हे शीर्षक फारच आवडले कारण तंत्रज्ञानातून समाजाचा विकास करणे ही संकल्पना खरोखरच उदात्त आहे.

यावेळी अगुस बुधीयोनो (इंडोनेशिया) हे मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘तंत्रज्ञानातून मुख्यत्वेकरून ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे. अशा संशोधन परिषदांमुळे संशोधनाला नक्कीच चालना मिळते. इंटरनेटच्या सहाय्याने भविष्यात अधिक संशोधन होण्यास मदत मिळणार आहे.’ या परिषदेच्या निमित्ताने बाहेरून आलेल्या  पाहुण्यांची उत्तम सोय करण्यात आली होती.

यावेळी प्रा.अशोक रानडे (कॅनडा), जे एम. चंद्रकिशन, राजाराम देसाई, डॉ.पद्माकर केळकर, डॉ. आय. थीरूनावक्कारसु, डॉ. आर. बालसुब्रमण्यम, डॉ. व्ही.के. सुरी, डॉ. व्ही. जे. कुलकर्णी, डॉ. दिलीप वाकुलाबरनम आदी मान्यवर उपस्थित होते. उद्या शनिवार दि.१० डिसेंबर रोजी डॉ. बोतीर उस्मानोव्ह (उझबेकिस्तान), प्रा.तीर्थांकर बॅनर्जी (ऑस्ट्रेलिया), डॉ. नेहा बियाणी (अमेरिका), डॉ. वेंकट रेड्डी (दुबई) हे मार्गदर्शन करणार आहेत. भारतातील प्रमुख मार्गदर्शकांपैकी डॉ. गौरव बरतारया, डॉ. विजयकुमार पाल, डॉ. कॅशफुल ओरा, डॉ. एन.बी.पासलकर, डॉ. प्रताप सानप, डॉ. संजय तोष्णीवाल, श्रीनिवास चामर्थी आदी तज्ञ संशोधक व अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी स्वेरीचे नूतन अध्यक्ष दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेव कागदे, विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडा, विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरीच्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. मीनल भोरे यांनी केले. उद्या दि.१० डिसेंबर हा  शेवटचा दिवस असून या परिषदेच्या निमित्ताने स्वेरीच्या संशोधन संस्कृतीसाठी अधिक  पोषक वातावरण तयार झाले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली व या आंतरराष्ट्रीय परिषदेचे सहसमन्वयक डॉ.प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘टेक्नो-सोसायटल २०२२’च्या यशस्वीतेसाठी  सर्वजण परिश्रम घेत आहेत.