मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून उद्योग आणणार - मनसे नेते दिलीप धोत्रे
पंढरपूरात "एमआयडीसी" मंजूर झाल्याने मिळणार तरुणांच्या हाताला काम..
मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून उद्योग आणणार - मनसे नेते दिलीप धोत्रे
पंढरपूरात "एमआयडीसी" मंजूर झाल्याने मिळणार तरुणांच्या हाताला काम
पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे एमआयडीसी होण्यासाठी आपण प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नाला यश आले असून शासनाने कासेगाव येथे एमआयडीसी मंजूर केली आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आता पुणे, मुंबई येथे जाण्याची आवश्यकता नाही. त्यांना कासेगाव येथेच नोकरी मिळणार आहे. नागरिकांच्या कामासाठी आपण नेहमी प्रयत्न करणार असल्याचे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले.

पंढरपूर तालुक्यातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी यांना मदत करण्यासाठी आपण नेहमी काम केले आहे. कोरोना काळात नागरिक अडचणीत असताना त्यांना मदत केली आहे.विविध कार्यक्रम घेऊन नागरिकांचा सहभाग घेतला आहे. यामुळे सदैव नागरिकांच्या मदतीला धावून जाणारा नेता, अशी आपली ओळख पंढरपूर तालुक्यात झाली आहे.

गेल्या ४० वर्षापासून पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी व्हावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे आपण यासाठी मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून उद्योग मंत्री उदय सामंत यांची यांची भेट घेऊन पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे एमआयडीसी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. यास यश आले असून शासनाने कासेगाव येथे एमआयडीसी मंजूर केली आहे. एमआयडीसी पहिल्यांदा मंजूर झाल्यावर कोणत्या पक्षाच्या नेत्यांनी यास विरोध केला होता, हे नागरिकांना माहीत आहे.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नागरिक त्या पक्षातील उमेदवाराला योग्य जागा दाखवतील याची खात्री आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत आपण पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक कामे केली असल्याने नागरिक आपल्या पाठीशी उभे आहेत. यामुळे या निवडणुकीत आपणाला यश मिळणार आहे.
आपण यापुढेही सदैव नागरिकांची कामे करण्यासाठी तत्पर राहणार आहे.कासेगाव येथे कारखाने आणण्यासाठी आपण राज ठाकरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे धोत्रे यांनी आज पंढरपूर मनसे कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.