पुणे शिक्षक मतदारसंघात रोंगे विरुद्ध सावंत लढतीचे चित्र; गावडे आणि आसगांवकर यांना शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान

पुणे शिक्षक मतदारसंघात रोंगे विरुद्ध सावंत लढतीचे चित्र; गावडे आणि आसगांवकर यांना शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान

पुणे शिक्षक मतदारसंघात रोंगे विरुद्ध सावंत लढतीचे चित्र; गावडे आणि आसगांवकर यांना शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान

पंढरपूर - पुणे शिक्षक मतदारसंघाच्या
निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून, उमेदवारांकडून पाचही जिल्ह्यांतील शिक्षक, शाळांचे संस्थाचालक आणि संबंधित घटकांच्या भेटीगातींवर भर दिला जात आहे. प्रत्येक तालुक्यात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्याची रणनीती उमेदवारांनी आखली आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार डॉ. बी. पी. रोंगे आणि कृती समिती व राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना अद्याप शिक्षक मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे आव्हान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

डॉ. बी. पी. रोंगे यांनी पहिल्या टप्प्यातील प्रचार पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही प्रचाराची आघाडी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू कैले आहेत. विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक-सचिव असलेल्या रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर संवाद साधण्यावर आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यावर भर दिला आहे. शिक्षकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका त्यांनी घेतली असल्याने त्यांच्या प्रचाराला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र समर्थकांकडून मांडले जात आहे.

दूसरीकडे माजी आमदार दत्तात्रय सावंत यानीही प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, विविध तालुक्यांमध्ये भेटीगाठी आणि संपर्क मोहिमेद्वारे मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. मात्र,त्यांच्या मागील आमदारकीच्या काळात शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसह विविध प्रश्नांवर अपेक्षित तोडगा निघाला नसल्याची नाराजी काही शिक्षकांमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या मागील कामकाजाचा मुद्दा प्रचारात महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यासमोर मात्र वेगळे आव्हान दिसत आहे.पक्षाचे कार्यकर्त आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू असला, तरी प्रत्यक्ष मतदार असलेल्या शिक्षकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याशी थेट संवाद साधणे आवश्यक आहे. केवळ पक्षसंघटनेच्या बळावर नव्हे, तर शिक्षकांच्या प्रश्नांवरील ठोस भूमिका आणि वैयक्तिक संपर्काच्या आधारेच या निवडणुकीत मतदारांचा विश्वास संपादन करावा लागणार आहे.

विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगांवकर यांच्याबाबतही शिक्षकांच्या प्रश्नांवरून नाराजी असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडले गेले नाहीत, अशी टीका त्यांच्या विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीसमोरही शिक्षकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचे आव्हान उभे राहू शकते.

पुणे शिक्षक मतदारसंघात पाच जिल्ह्यांतील ५८ तालुके आणि सुमारे ६१ हजार शिक्षक मतदारांचा उल्लेख प्रचाराच्या चर्चत होत आहे.या मोठ्या मतदार वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला नियोजनबद्ध प्रचार करावा लागणार आहे.शिक्षकांचे प्रश्न,जुनी पेन्शन योजना सेवा संबंधित अडचणी आणि विधान परिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व या मुद्यांभोवती निवडणुकीतील चर्चा केंद्रित होत आहे.

एकीकडे डॉ.बी.पी.राँगे यांच्याकडून शिक्षकांशी थेट संवादावर भर दिला जात आहे, तर दुसरीकडे दत्तात्रय सावंत यांनीही प्रचाराची गती वाढवली आहे. 

भाजपचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत तासगावकर यांच्यासमोर मतदारांचा विश्वास संपादन करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे सध्याच्या प्रचाराच्या चित्रावरून रोंगे विरुद्ध सावंत अशी प्रमुख लढत रंगण्याची शक्यता व्यक्त होत.