‘एक दिवस एक तास एकसाथ’ चा पंढरपुरात जागर; नगराध्यक्षा प्रणीताताई भालके यांच्या सहभागाने भव्य स्वच्छता मोहीम
नगराध्यक्षा प्रणीताताई भालके यांच्या सहभागाने भव्य स्वच्छता मोहीम
‘एक दिवस एक तास एकसाथ’ चा पंढरपुरात जागर;
नगराध्यक्षा प्रणीताताई भालके यांच्या सहभागाने भव्य स्वच्छता मोहीम
पंढरपूर : - स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पंढरपूरच्या संकल्पनेला बळ देत पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने ‘एक दिवस एक तास एकसाथ’ या उपक्रमांतर्गत शहरात भव्य सामूहिक श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.भीमा नदी वाळवंट परिसरात नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणीताताई भगीरथ भालके यांच्या सहभागाने स्वच्छता अभियानास सुरुवात झाली. नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसराची स्वच्छता केली.

या अभियानांतर्गत शहरातील विविध प्रमुख मार्ग, चौक व सार्वजनिक परिसरांमध्ये एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. **विणे गल्ली ते धोंडोपंतदादा मठ, न.पा. गॅरेज ते दगडी पूल रोड, महात्मा फुले चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर कमान, भूयाचा मारुती ते उपजिल्हा रुग्णालय कॉर्नर व उकळीकर बोळ, चंद्रभागा बस स्थानक सुलभ शौचालय ते सरगम चौक ते अकलूज नाका, तसेच के.बी.पी. कॉलेज चौक ते चंद्रभागा स्थानक सुलभ शौचालय** या परिसरांमध्ये स्वच्छता करण्यात आली.

पंढरपूर हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने शहराची स्वच्छता व सार्वजनिक परिसरांचे सुशोभीकरण याला विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी' हा संदेश देण्यात आला.
नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे शहरातील स्वच्छतेच्या उपक्रमांना नवी ऊर्जा मिळाली असून, नागरिकांनीही स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.