साखरेला ५०, इथेनॉलला ७५ रुपये द्या; ऊस उत्पादकांचा दिल्लीवर एल्गार ; ऊस दर संघर्ष समिती यांची पत्रकार परिषदेत माहिती
दि.५-६ ऑक्टोबरला जंतर-मंतरवर आंदोलन
साखरेला ५०, इथेनॉलला ७५ रुपये द्या; ऊस उत्पादकांचा दिल्लीवर एल्गार ; ऊस दर संघर्ष समिती यांची पत्रकार परिषदेत माहिती
दि.५-६ ऑक्टोबरला जंतर-मंतरवर आंदोलन
पंढरपूर - वाढता उत्पादन खर्च, घटते ऊस उत्पादन आणि केंद्राच्या साखर धोरणामुळे अडचणीत आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता थेट दिल्लीची वाट धरली आहे. महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी ५ व ६ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणार असून, सोलापूर जिल्ह्यातून सुमारे एक हजार शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती ऊस दर संघर्ष समितीने पंढरपूर येथे दिली.

साखरेची एमएसपी ५० रुपये किलो, इथेनॉलचा दर ७५ रुपये प्रतिलिटर करावा, साखरेचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतील समावेश वगळावा, घरगुती व औद्योगिक वापरासाठी साखरेचे स्वतंत्र कोटे करून त्यांचे दर अनुक्रमे ५० व १०० रुपये किलो निश्चित करावेत, तसेच दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनातून करण्यात येणार आहेत.

ऊस दर संघर्ष समितीचे दीपक भोसले म्हणाले की, कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे यंदा ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे. पूर्वी १०० टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचे उत्पादन अनेक ठिकाणी ४० टनांवर आले आहे. त्यातच खत, औषधे, मजुरी, पाणी व वीज यांचा खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे योग्य ऊस दरासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्ली आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील सर्व संघटना ऊस दराच्या प्रश्नावर एकत्र आल्या होत्या. त्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे ६०० कोटी रुपये अतिरिक्त जमा झाले, असा दावा भोसले यांनी केला. यंदाही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांनी गाळपासाठी घाई करू नये, तसेच कारखानदारांनी आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. अन्यथा गरज पडल्यास साखर कारखाने बंद पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
५ ऑक्टोबरला जंतर-मंतरवर धरणे आंदोलन, तर ६ ऑक्टोबरला संबंधित केंद्रीय मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा होणार आहे. बैठकीस दीपक भोसले, सचिन पाटील, समाधान फाटे, सुहास पाटील, माऊली जवळेकर, निवास नागणे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.