आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजिक उपक्रमांचे आयोजन
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजिक उपक्रमांचे आयोजन
दि. १ ते ६ ऑगस्टदरम्यान विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन
आ.अभिजीत पाटील यांचा वाढदिवस विविध समाजिक उपक्रमांनी होणार साजरा
पंढरपूर - राजकीय नेत्यांचा वाढदिवस केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याची परंपरा कायम ठेवत, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) धनंजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ ते ६ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या उपक्रमांमध्ये शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप, स्नेहभोजन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी, मोफत चष्मे वाटप, सर्वरोग निदान शिबिर तसेच महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
कार्यक्रमांची सुरुवात १ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता बाभुळगाव येथील श्री नागनाथ मूकबधिर निवासी शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन आणि वृक्षारोपणाने होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार असून, कारखाना कार्यस्थळीही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि.३ ऑगस्ट रोजी कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत रक्तदान शिबिर, नेत्ररोग तपासणी आणि गरजूंसाठी मोफत चष्मे वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वरोग निदान शिबिरात अस्थिरोग, फिजिशियन तपासणी, नेत्ररोग तपासणी, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर यांसह विविध आरोग्य तपासण्या व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत ६ ऑगस्ट रोजी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, कर्करोग जनजागृती, आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचा समावेश असणार आहे.
आमदार अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी समाजहिताचे उपक्रम राबविण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.