पंढरपुरात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा;आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचा पाचवा वर्धापन दिनही संपन्न
पंढरपुरात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा;आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचा पाचवा वर्धापन दिनही संपन्न
पंढरपूर - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिन पंढरपूर शहरात आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरा करण्यात आला.
याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचा पाचवा वर्धापन दिन साजरा करून भाविकांना लाडू वाटप करण्यात आले.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी महाराजांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. शिवराज्याभिषेक दिन हा स्वाभिमान, शौर्य, न्याय आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ऐतिहासिक दिवस असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी नमूद केले.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पाटील, स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हा संघटक अनिल बागल, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष लखन घाडगे, महिला राज्य उपाध्यक्ष कुसुम गोडसे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष महीला मृदुला साठे मॅडम,पंढरपूर तालुका अध्यक्ष महीला विजयमाला रोपळकर,भाळवणी गटाचे अध्यक्ष मल्हारी फाळके,मनसे शहर उपाध्यक्ष प्रदीप परचंडे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ ही मराठा समाजाच्या हितासाठी, सामाजिक न्यायासाठी तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली एक प्रमुख संघटना आहे. समाजातील युवकांना प्रोत्साहन देणे, सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणे, गरजू घटकांना मदत करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार, प्रचार करणे यासाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमानंतर पंढरपुरात आलेल्या भाविकांना लाडू वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवराज्याभिषेक दिन आणि संघटनेचा वर्धापन दिन एकत्रितपणे साजरा करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले होते.