पंढरपूर पंचायत समितीत ‘सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ ; कल्याणकारी योजना थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवणार
पंढरपूर पंचायत समितीत ‘सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ ; कल्याणकारी योजना थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवणार
पंढरपूर :- शासकीय सेवा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासोबतच, गावांच्या स्थानिक गरजा ओळखून विकासाला लोकसहभागाची जोड देण्यासाठी पंचायत समिती पंढरपूर येथे ‘सेवा संकल्प अभियान’ चा शुभारंभ करण्यात आला. पंचायत समितीच्या शेतकी भवन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती शुभम आगावणे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.
दिनांक 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या एक महिन्याच्या कालावधीत पंढरपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर हे अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ योजनांची माहिती दिली जाणार नसून, नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे आणि त्यांच्या प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करणे यावर प्रशासनाचा मुख्य भर असणार आहे.

"प्रशासन आणि नागरिक यांनी योग्य समन्वय ठेवून विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत कसा पोहोचवता येईल, यासाठी या अभियानाचा प्रभावी वापर करावा असे यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात सभापती शुभम आगावणे यांनी या अभियानाचे महत्त्व विशद करत सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी अभियानाची सविस्तर रूपरेषा आणि नियोजित उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमाला उपसभापती प्रमोद देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य यांच्यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, नागरिक आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन सोनकांबळे (स.प्र.अ.), शहाजहान तांबोळी (क.प्र.अ.), महेश वैद्य (वरिष्ठ सहाय्यक) आणि प्रताप बोंगाळे (तालुका समन्वयक) यांनी विशेष परिश्रम घेतले.