वाखरी येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

‘विविधतेत एकता’ आणि ‘विकसित भारत’चा संदेश देत विद्यार्थ्यांनी केला देशभक्तीचा जागर

वाखरी येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

वाखरी येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

‘विविधतेत एकता’ आणि ‘विकसित भारत’चा संदेश देत विद्यार्थ्यांनी केला देशभक्तीचा जागर

पंढरपूर - वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. २०४७ मध्ये ‘विकसित भारत’चे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून भारताची विविध क्षेत्रांतील प्रगती, सांस्कृतिक वैविध्य आणि विविधतेतील एकतेचे दर्शन घडविणारा स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे डॉ. सुदेश दोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली.

याप्रसंगी एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य स्वप्निल शेठ आणि एमआयटी वाखरी संकुलाचे सहयोगी संचालक कर्नल डी. के. उपाध्याय उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करताना भारताच्या सांस्कृतिक वैविध्यात दडलेली एकात्मता प्रभावीपणे मांडली. यावेळी विद्यार्थ्यांनी कराटे प्रात्यक्षिक व  योगासने सादर केली. देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्याविष्कार, काव्यरचना आणि देशभक्तिपर समूहगीतांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली. 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. सुदेश दोशी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की “विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याची ताकद आजच्या युवा पिढीत आहे; गरज आहे ती या युवा पिढीच्या विचारांना योग्य दिशा देण्याची. देशप्रेम हे केवळ घोषणांमध्ये न राहता आपल्या कृतीतून दिसले पाहिजे.”

शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “देशसेवा करण्यासाठी नेहमीच मोठे कार्य करावे लागते असे नाही. दैनंदिन जीवनातील आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे हीदेखील देशसेवाच आहे.”

“आजचे विद्यार्थी भविष्यातील विकसित भारताचे शिल्पकार असून, ज्ञानासोबतच संस्कार, शिस्त, राष्ट्रनिष्ठा आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना आत्मसात करण्याचे आवाहन” ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य स्वप्निल शेठ यांनी याप्रसंगी बोलताना केले. देशभक्तीचा संदेश आणि विकसित भारताच्या संकल्पनेची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत आपले योगदान देण्याचा संकल्प यावेळी केला.