अज्ञानाचा अंत करणारे अवतार म्हणजे संत - ह.भ.प. अॅड. जयवंत महाराज बोधले
पंढरपूर येथे धनश्री प्रवचनमालेचा तिसरा दिवस; श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अज्ञानाचा अंत करणारे अवतार म्हणजे संत - ह.भ.प. अॅड. जयवंत महाराज बोधले
पंढरपूर येथे धनश्री प्रवचनमालेचा तिसरा दिवस; श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरपूर - संत हा शब्द व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो एक तत्व आहे. संतत्व बाह्य स्वरूपात नव्हे, तर आंतरंगातून ओळखता येते, असा मार्मिक संदेश ह.भ.प. अॅड. जयवंत महाराज बोधले यांनी दिला. संत जनाबाईंच्या सखा माझा ज्ञानेश्वर या अभंगाचे सखोल विवेचन करताना त्यांनी समाजाला अंतर्मुख करणारा आध्यात्मिक व मूल्याधारित दृष्टिकोन दिला.
पंढरपूर येथील आरती मंडप येथे धनश्री, सीताराम व आष्टी परिवाराच्या वतीने आयोजित पाच दिवसीय धनश्री प्रवचनमालेच्या तिसऱ्या दिवशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी संत या शब्दाचा खरा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, संत हा कोणालाही सहजपणे लावण्याचा विशेषण नसून तो अंतःकरणातील निर्मळता, समत्व आणि ज्ञानाची अवस्था दर्शवणारे तत्व आहे.

ते पुढे म्हणाले की, संत म्हणजे निंदा-स्तुतीपासून अलिप्त राहणारी व्यक्ती. संतांचे चरित्र हे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नसून ते व्यवहार आणि प्रपंच कसा करावा, याचे मार्गदर्शन करते. संत हे अज्ञानाचा अंत करणारे अवतार असून अवतार म्हणजे निर्गुणातून सगुणाकडे येणे, तर अज्ञान म्हणजे विकल्पात्मक ज्ञान होय.
नामदेव महाराजांच्या दृष्टिकोनातून ज्ञानेश्वर महाराज हे संपूर्ण ब्रह्मांड असल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी हे आनंद देणारे स्थान असल्याने ते परिपूर्ण असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. नखशिखांत ज्ञानोबा हेच ज्ञानाचे स्वरूप आहेत. अलौकिक दृष्ट्या ते अनाथ असतील, पण ते संपूर्ण विश्वाचे नाथ आहेत. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना शुद्ध मनाचे योगी म्हटल्याचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की, मनाला दुर्जनांचा संग लागला तर ते अशुद्ध होते; मात्र ज्ञानेश्वरांचे मन उपाधीरहित आणि पावन होते. उपाधी ही बाह्य व अंतर्मनातील अशा दोन प्रकारची असते. जे उपाधीरहित असतात, तेच खऱ्या अर्थाने पवित्र असतात.
तत्कालीन व्यवस्थेने संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताबाई यांना संन्याशाची मुले म्हणून हिणवले. त्यांच्या वेदाध्ययनावर आणि धार्मिक अधिकारावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पैठण येथील धर्मसभेत त्यांना आव्हान देण्यात आले. मात्र, संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानाच्या व योगशक्तीच्या बळावर सर्व प्रश्नांना उत्तरे देत धर्मसभेला निरुत्तर केले. कथांनुसार, त्यांनी एका रेड्याच्या मुखातून वेद वदवून कर्मठांचा अहंकार खचवला.
भगवे वस्त्र धारण केल्याने कोणी संन्याशी होत नाही; संवाद होणे गरजेचे आहे. संवादातून विचारांची देवाणघेवाण घडते,असेही त्यांनी सांगितले. प्रारब्ध बदलण्याचे सामर्थ्य ज्यांच्याकडे असते तेच संत असतात, असे प्रतिपादन करताना त्यांनी जीवनातील कर्तव्याचे महत्त्व अधोरेखित केले. मातीने मडक्याचा, तंतूंनी कपड्याचा, अग्नीने उष्णतेचा, पाण्याने ओलाव्याचा कंटाळा करून चालत नाही, तसेच मनुष्याने कर्माचा कंटाळा करून चालत नाही.

येणे पारतंत्र आणि जाणे स्वातंत्र्य म्हणजे देव; येणे-जाणे दोन्ही स्वातंत्र्य म्हणजे संत; तर येणे-जाणे दोन्ही पारतंत्र म्हणजे मनुष्य, असे तत्त्वज्ञानही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रवचनमालेस भागवताचार्य बाळासाहेब बडवे,
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, सु. रा. परिचारक पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, विठ्ठल शुगरचे संचालक समाधान काळे, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, ह.भ.प. राजेंद्र मोरे महाराज देहूकर, विठ्ठल शुगरचे माजी व्हा. चेअरमन लक्ष्मण पवार, सुभाषशेठ मर्दा, उद्योजक उद्धवबापू बागल, धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, चेअरमन शोभाताई काळुंगे तसेच सीताराम आणि आष्टी शुगरचे सीईओ डॉ. राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांच्यासह पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माढा व मोहोळ येथील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.