१८ संताच्या नावाने आदर्श वारकरी समर्पित जीवन गौरव पुरस्कार

डॉ.विश्वनाथ दा. कराड यांची घोषणा

१८ संताच्या नावाने आदर्श वारकरी समर्पित जीवन गौरव पुरस्कार

१८ संताच्या नावाने आदर्श वारकरी समर्पित जीवन गौरव पुरस्कार डॉ. विश्वनाथ दा. कराड यांची घोषणा

पंढरपूर, (दिः६) - आषाढी वारीच्या निमित्ताने वाखरी, पंढरपूर येथे येणार्‍या दिंड्यांच्या  वारकर्‍यांना दर वर्षी १८ संतांच्या नावाने आदर्श वारकरी समर्पित जीवन गौरव पुरस्कार दिला जाईल. अशी घोषणा कार्तिक एकादशीच्या निमित्ताने विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी वाखरी येथे केली.

विश्व शांती केंद्र (आळंदी) माईर्स एमआयटी,पुणे,भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने दिला जाणार हा पुरस्कार वाखरी येथील पुर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग अक्का कराड अन्नपूर्ण सदन (विठ्ठल मंदिर) येथे दिला जाणार आहे.
तसेच कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील असे मान्यवर व्यक्ंती जे नोकरी व्यवसाय आणि उच्चशिक्षित असून वारकरी संप्रदायाचा निरपेक्षपणे प्रचार आणि प्रसार करणारे किर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते यांना आदर्श कीर्तनकार, प्रवचनकार गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. वरील दोन्ही पुरस्काराचे स्वरूप संपूर्ण पोशाख, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह आहे.

समाजात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदावे यासाठी महाराष्ट्रातील संत निवृत्ती, ज्ञानदेव महाराज, सोपान,मुक्ताबाई, एकनाथ महाराज ,संत नामदेव, जगदगुरू तुकाराम महाराज, जणाबाई, गोराकुंभार, सावतामाळी, सकुबाई, सेनानाव्ही, संत कुर्मदास, संत रोहिदास महाराज, जगमित्र नागा, संत निळोबा राय, संत गजानन महाराज, संत चोखामेळा, नरहरी सोनार, राष्ट्रसंत गाडगे महाराज, तुकडोेजी महाराज यांच्या नावाने हा पुरस्कार दिला देण्यात येईल.  

द्वादशीच्या निमित्ताने सकाळी पांडूरंगाची महापूजा झाली. त्यानंतर विश्वशांती दिंडीच्या अध्यक्ष सौ. उषा विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात विश्वशांती गुरूकुल, वाखरी मध्ये दिंडी काढण्यात आली. विविध संतांचे अभंग गात ही दिंडी मंदिरात पोहचली. त्यांनतर भारतीय परंपरेनुसार व अनादी कालानुसार चालत आलेला तुळशी विवाह डॉ. विश्वनाथ कराड व  उषा कराड यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

यावेळी डॉ. कराड यांनी वरील घोषणा केली व तुळशी विवाहाचे महत्व पटवून दिले. तसेच ज्या घरात श्रध्दा आणि विश्वासाने तुळशीची पुजा केली. त्या कुटुंबात सुख आणि समाधान नांदते.आयोजित कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन ह.भ.प. शालीकराम महाराज खंदारे यांनी केले.