स्वेरीमध्ये ‘विकसित गाव अभियान’ अंतर्गत ‘जलतारा प्रकल्प शुभारंभ’ व ‘सेंद्रिय रत्न पुरस्कार’ सोहळा संपन्न

स्वेरीमध्ये ‘विकसित गाव अभियान’ अंतर्गत ‘जलतारा प्रकल्प शुभारंभ’ व ‘सेंद्रिय रत्न पुरस्कार’ सोहळा संपन्न

स्वेरीमध्ये ‘विकसित गाव अभियान’ अंतर्गत ‘जलतारा प्रकल्प शुभारंभ’ व ‘सेंद्रिय रत्न पुरस्कार’ सोहळा संपन्न

पंढरपूर - स्वेरीमध्ये ‘विकसित गाव अभियान’ अंतर्गत ‘जलतारा प्रकल्प शुभारंभ’ व ‘सेंद्रिय रत्न पुरस्कार’ सोहळा नुकताच संपन्न झाला. यामध्ये ‘मिशन विकसित गाव अभियान अंतर्गत खेड्यांचा समृद्ध विकास या विषयावर सोलापूर जिल्हा (ग्रामीण)चे पोलीस अधीक्षक, आय. पी. एस. अतुल कुलकर्णी यांनी उदघाटक म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व जलताराचे जनक प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी शेतकऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन कडून स्वेरीमध्ये आयोजिलेल्या या भव्य कृषी कार्यक्रमात सोलापूर व जवळपासच्या जिल्ह्यातील अनेक शेतकरी, पोलीस पाटील उपस्थित होते. महाराष्ट्र गीतानंतर प्रास्ताविकात किसान संस्थापक व मिशन विकसित गाव अभियानचे जिल्हा समन्वयक व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी नानासाहेब उर्फ भुजंगराव कदम यांनी शाश्वत कृषी तंत्रज्ञान समाजाला कसे उपयोगी ठरते हे सांगून संतांचे मार्गदर्शन आणि पोलिसांचा दंड हे समाजाला योग्य स्थितीत ठेवतात.असे सांगून संपूर्ण कार्यक्रमाचे स्वरूप सांगितले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज् ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी स्वागत केले व विकसित तंत्रज्ञान आणि उत्तम शेती या संदर्भात अभ्यासपूर्ण भाष्य केले.

जलतारा प्रकल्पचे जनक प्रा.डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून एका पावसाळ्यात चार लाख लिटर पाणी जमिनीमध्ये कसे मुरवले जाते याचे स्वेरी कॅम्पसमध्ये वैज्ञानिक सादरीकरण केले व प्रत्यक्ष जलतारा प्रकल्प शुभारंभ केला. पुढे उदघाटक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ‘मिशन विकसित गाव अभियान' अंतर्गत जलसंधारण, वृक्षारोपण, गुन्हेगारी मुक्त गाव, शाश्वत कृषी व्यवस्था’ या संदर्भात उपस्थितांना अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले व सोलापूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन माध्यमातून हा मॉडल प्रकल्प १०० गावांमध्ये राबविण्याचे सुतोवाच केले.

यावेळी चाळीसगावच्या फर्टीलायझर लॉक टेक्नॉलॉजीचे संशोधक शास्त्रज्ञ प्रकाश पवार यांनी एफ कॉन प्रज्वल बायोमिनवा वापरा द्वारे रासायनिक खतांची बचत व भरघोस उत्पादन कसे घेता येते याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. जिल्हा समन्वयक नानासाहेब कदम यांनी मिशन द्वारा एकरी शंभर टन ऊस उत्पादन, केळी, द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, भाजीपाला क्लस्टर कशा पद्धतीने वर्षभर राबवू शकतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच राज्यस्तरीय कृषी संमेलन जून मध्ये घेणार असल्याची घोषणा केली. यावेळी डॉ.बी.पी. रोंगे यांनी ‘मिशन विकसित गाव अभियान साठी सहकार्य करु’ असे सांगितले.

'यावेळी सध्याच्या बाजारातील इतर रासायनिक व शेतीत कमी उत्पादन देणारी व हानिकारक खते न वापरता सेंद्रिय खते वापरून विक्रमी पीक काढणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी भव्य सत्कार करण्यात आला.

यामध्ये अंध शेतकरी मालोजी चव्हाण (जामगाव, ता.माढा), स्वप्निल आसबे (अनवली), गणेश नवले (टेंभूर्णी), संजय साबळे (पंढरपूर), शुभम बागल (पंढरपूर), उमेश महाराज देशमुख (बार्शी), अजिंक्य लोकरे (टेंभूर्णी), रवि भोसले (अनवली) व संतोष पवार (वैराग) या सोलापूर जिल्ह्यातील ‘सेंद्रिय शेती’ करणाऱ्या नऊ सेंद्रिय शेतकरी यांना ‘सेंद्रिय शेती रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. जलतारा प्रकल्पाच्या या कार्यक्रमासाठी श्री श्री साखर कारखाना राजेवाडीचे चेअरमन शेषेगिरी राव, पंढरपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, पोलीस अधिकारी, सोलापूर जिल्ह्यातील पोलीस पाटील, शेतकरी, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.