शक्तीपीठ महामार्गाचा मोबदला पाचपट मिळावा - विजयसिंह देशमुख
कासेगाव सह ११ गावांत होणार जमिन संपादीत; समृद्धी महामार्गा प्रमाणे मिळावी रक्कम
शक्तीपीठ महामार्गाचा मोबदला पाचपट मिळावा - विजयसिंह देशमुख
कासेगाव सह ११ गावांत होणार जमिन संपादीत; समृद्धी महामार्गा प्रमाणे मिळावी रक्कम
पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यातील कासेगाव सह अकरा गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गासाठी संपादित करण्याचे काम होत आहे त्यांना समृद्धी महामार्ग प्रमाणे तसेच चालू बाजारभावाप्रमाणे पाचपट रक्कम मिळावी अशी मागणी कासेगाव येथील विजयसिंह देशमुख यांनी बाधित शेतकऱ्यांसह प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शक्तिपीठ महामार्गामध्ये कासेगाव येथील सुमारे दोनशे शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार असून त्यांनी दिलेले निवेदनात बाधित शेतकऱ्यांनी म्हटले आहे कि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दि. ०७/०३/२०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या राजपत्रा प्रमाणे महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाने बाधीत शेतकऱ्यांचे राजपत्र प्रसिध्द केलेले आहे. त्याप्रमाणे बाधीत शेतकर्यांनी आपले म्हणणे असलेले सह्याचे निवेदन दिले आहे.
यामध्ये महाराष्ट्र शासनाकडुन महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गान बाधीत होणारे शेतकऱ्यांचा सदर शक्तीपीठ महामार्गास तिव्र विरोध आहे. सदर द्रुतगती मार्गाने शेतकऱ्यांच्या बागायती शेतजमिनीचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होणारे आहे. त्यामुळे बागायती पिका खालील क्षेत्र नष्ट होवुन शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शेतकरी भूमिहीन होत आहेत. त्यामुळे बाधित शेतकरी सदर शक्तीपीठ महामार्गास तिव्र प्रकारे विरोध दर्शवित आहोत.

तसेच महाराष्ट्र शासनाने सदर महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी शेतजमिन भुसंपादन करणे अनिवार्य आहे. असे मत झाल्यास सदर शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाने बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना बाधीत शेतजमिनीचा मोबदला रस्त्या लगतच्या शेतजमिनी म्हणुन ग्राह्य धरून त्या भागातील अतिउच्चतम खरेदी-विक्रीचा व्यवहाराचा दर विचारात घेवुन सदर व्यवहाराच्या चौपट मोबदला व खाजगी वाटाघाटीने दिलासा रक्कम एक पट असा एकुण पाचपट मोबदला बाधीत शेतकऱ्यांना देणेत यावा.
सदर महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गामुळे बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मधील पिकांचा कृषी अधिकाऱ्या मार्फत पंचनामा करून जागेवरील फळपिकांचा मोबदला प्रचलित चालु बाजार भावाप्रमाणे देण्यात यावा.तसेच सदर महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या जलसिंचनाचे साधन जसे की विहीर, बोअर किंवा शेततळे इत्यादी सारखे जलसिंचनाचे साधन नष्ट होत असल्यास त्याचा देखील मोबदला चालु प्रचलित बाजारभावा प्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात यावा.सदर महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गामुळे बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त बाधीत शेतकरी
म्हणुन दाखला देणेत यावा.
सदर महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाने बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला देवुनच द्रुतगती महामार्गाचे काम सुरू करावे. ज्याव्दारे बाधीत शेतकऱ्यांचा सदर महामार्गास विरोध होणार नाही याचीही दक्षता महाराष्ट्र शासनाचे अधिनस्त अधिकारी म्हणुन आपण काळजी घ्यावी.
सदर महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाने बाधीत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कायमस्वरूपी शासन, भुसंपादन करीत असल्याने काही शेतकरी भुमिहीन होत आहेत.त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन राहणार नाही त्यामुळे त्यांना उपजिवीकेच्या सुख,सुविधा,सोई महाराष्ट्र शासनातर्फे बाधीत भूमिहीन शेतकऱ्यांना करून देणेची व्यवस्था करावी.
सदर महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाने बाधीत शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची सरकारी मोजणी करून जागेवरती नेमक्या किती व कोणत्या शेतकऱ्याचे किती क्षेत्र भुसंपादन करणे आवश्यक आहे. याची इतंभुत माहिती मोजणी अंती शेतकऱ्यांना देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्याकडे देऊन मागणी करण्यात आली आहे.