उत्कर्ष हे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र ठरेल - मंत्री जयकुमार गोरे
‘उत्कर्ष बालक मंदिर’ नव्या इमारतीचे ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
उत्कर्ष हे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र ठरेल - मंत्री जयकुमार गोरे
‘उत्कर्ष बालक मंदिर’ नव्या इमारतीचे ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पंढरपूर :- महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि जलसंधारण या त्रिसूत्रीवर कार्यरत असलेल्या माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेच्या “उत्कर्ष बालक मंदिर” या नव्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी मंत्री गोरे म्हणाले की “संस्थेचे कार्य समाजाभिमुख आणि स्त्रीशक्ती सक्षमीकरणाला चालना देणारे आहे. महिलांच्या अडचणी सोडवणे हे केवळ संस्थेचेच नव्हे तर शासनाचेही कर्तव्य आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण करून नव्या योजनांसाठी शासन पाठबळ देईल.”

संस्थेच्या “उत्कर्ष बालक मंदिर” या इमारतीचे उद्घाटन करताना मंत्री महोदयांनी परिसराचा आढावा घेत शिक्षण क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले. “ही नवी इमारत ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र ठरेल,” असे त्यांनी सांगितले. इमारतीत प्रशस्त वर्गखोल्या, वाचनालय, खेळ साहित्य व आरोग्य तपासणी विभाग अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
संस्थाध्यक्षा प्रा. निलीमा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, संस्थेने शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, बचतगट चळवळ आणि जलसंधारण या क्षेत्रात अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबवले आहेत. “ग्रामीण समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत विकासाचा हात पोहोचवणे हेच संस्थेचे ध्येय असून, शासनाकडून अनुदान रूपी ‘भाऊबीज’ मिळावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री गोरे यांनी संस्थेच्या जलसंधारण उपक्रमांचे विशेष कौतुक करत सांगितले की, “पाण्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन या क्षेत्रात प्रतिष्ठानचे योगदान उल्लेखनीय आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी संस्थेने उभारलेले बचतगट ग्रामीण बदलाचे उदाहरण ठरले आहेत.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून समाजात सेवा, संस्कार आणि समर्पणाचे मूल्य रुजत आहे.
आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सर्व उपक्रमांना संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. “शासन आणि स्वयंसेवी संस्था यांनी हातात हात घालून काम केले तर ग्रामीण विकास अधिक गतीमान होईल,” असे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर संस्थापक अध्यक्षा डॉ. संजीवनी केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, तसेच केळकर व देशमुख उद्योगपती बाळासाहेब एरंडे, उद्योगपती भाऊसाहेब रुपनर माजी नगरसेवक बाळासाहेब झपके, खरेदी विक्री संघ संचालक पोपट गडदे , उल्हास धायगुडे, बाळासाहेब काटकर, प्रशांत वलेकर, परिवारातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक विकास घुगे,
शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सदस्य, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख,सुयोग नवले यांच्यासारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात सौ. मनिषा ठोंबरे यांच्या “काव्यपूर्ती” या काव्यसंग्रहाच्या प्रती प्रमुख पाहुण्यांना भेट देण्यात आल्या. या काव्यसंग्रहात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करणारी कविता समाविष्ट आहे.
सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्था सचिव वसुंधरा कुलकर्णी यांनी मानले.

संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नव्या “उत्कर्ष बालक मंदिर” इमारतीतून भावी पिढीला संस्कारयुक्त शिक्षण देण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला. समाजसेवा, आरोग्य, शिक्षण आणि महिला सबलीकरण याच्या माध्यमातून माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान ही संस्था ग्रामीण विकासाची प्रेरणा ठरत आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था पदाधिकारी, संस्था सदस्य, उत्कर्ष विद्यालयाचा संपूर्ण सेवक वर्ग, सर्व हितचिंतक आणि स्वयंसेवक यांनी खूप परिश्रम घेतले.